Monday, August 17, 2009
आजा नच ले...
नंतर मला इतर काही सिनेमांमधले असे मजेशीर नाच तसेच काही 'हीरों'ची नाचण्याची इष्टाइल आठवत राहिले. मला आठवलेले काही नाच इथे देत आहे...
- 'सपनेमे मिलती है' (सत्या) मधला मनोज वाजपेय़ीचा नाच
- 'यारो सुनलो जरा' (रंगीला) या गाण्यात आमीरबरोबर त्याच्या मागे फिरणारया 'पक्या'चा नाच.
- 'सपनेमे कुडी वो कौनथी' (संजय दत्त आणि मनिषा कोईराला.) सिनेमाच नाव नाही आठवत. पण संजय दत्तच्या मागेपुढे नाचणारया भाईलोकांचा मजेशीर नाच मात्र आठवतोय.
- 'यारा ओ यारा' या गाण्यातला सनीचा नाच बघा. सायकलच्या टायरमधे पंपाने हवा भरतोय असं वाटत. - अलीकडच्या Delhi 6 मधील 'गेंदाफूल' गाण पाहिलय का? या गाण्यामधे अभिषेक, वहिदा इ. सगळे मिळून नाचत असतात तो प्रसंग छान वाटतो. 'मस्सकली' गाण्यातला सोनमचा नाच पण मजेशीर आहे.
- 'लक्ष' मधे 'अगर मै कहू' या गाण्यात चित्र-विचित्र हावभाव करत ऋतिकने केलेला नाच. तसेच त्याचा 'मै ऐसा क्यू हू' गाण्यातला नाचही लक्षात रहाण्यासारखा :)
- धरमपाजींची नाचण्याची इष्टाइल तर प्रसिद्धच आहे. तसेच जितेंद्रचे उड्या मारत नाचणे. पूर्वीच्या सिनेमांमधेले नाच पहायला छान वाटतात. गाण्याच्या तालावर मान आणि पाय एका ठराविक लयीत हलवून नाचायचे. मजा वाटते हे नाच पहाताना. :)
- 'भोली सुरत दिलके खोटे' मधली भगवानदादा ष्टाईलवरतर आपण जाम फिदा आहोत..
- पूर्वी मराठी सिनेमांमधे एक ठरलेला नेम असायचा. हिंदी गाण्यांचे मराठीमधे भाषांतर करायचे आणि अशा ४-५ गाण्यांचे मिश्रण करुन मराठी गाणे तयार करायचे. हे म्हणजे 'लक्शा' चे सिनेमे. त्यातल एक गाण मला अजूनही आठवत.
मूळ गाण होत 'आप जैसा कोई मेरे जिंदगीमे आये तो बात बन जाये...हो S हो S बात बन जाये..' आणि त्याचा मराठी अनुवाद असा केला होता
'तुमच्यावानी कोनी माझ्या जिंदगीत येईल
तर लै झाक होइल... हो S हो S लै झाक होइल...'
आठवतय का काही... अशी गाणी किंवा असे नाच ? :):)
Thursday, August 13, 2009
सांज ये गोकुळी सावळी सावळी...
मनाला एक अनामिक हुरहुर लावून जाते ही वेळ...
मनात जपलेल्या असंख्य गोष्टींचा गहिवर दाटून येतो. भावना व्यक्त करण ही प्रत्येकाची मानसिक गरज आहे. पण सगळ्याच वैयक्तिक गोष्टी या व्यक्त करण्यासाठी नसतात ना! काहीतरी खास असत जे फक्त आपल्याच मनाच्या एका कोपरयामधे जपून ठेवलेल असत. ही सांजवेळ मात्र या सगळ्या गोष्टींना मनाच्या पृष्ठभागावर घेऊन येते. एक स्वगत सुरु होत.. मनाच.. मनाशीच! पण या स्वगतामधलं एकटेपण नकोस होऊन जात कधी कधी.... मग मात्र मन कोणाच्यातरी वाटेकडे डोळे लावून बसतं. कोणीतरी आपल...मायेन जवळ घेणारं...कौतुकान पाठ थोपटणार...आपल म्हणण ऐकून घेणार...चूक असेल तर कान पकडून खडसावणार...
आपण अगदीच एकटेही नाही जगू शकत याची बोचरी जाणीव करुन जाते ही कातरवेळ...
तर कधी मोठ्या गोतावळ्यात वेढलेले असलो तरी आत कुठेतरी आपण एकटे आहोत हे वास्तवही समोर ठेवून जाते ही कातरवेळ..
मनाला एक अपूर्णतेची चुटपूट लावून जाते ही सांजवेळ...
Monday, August 10, 2009
प्रातःचलन
कधी आपल्याच 'इलाक्या'मधल्या पण पूर्वी कधी न गेलेल्या वाटेला लागयच तर कधी तळजाईची टेकडी गाठायची.
एकदा असचं फिरायला म्हणून बाहेर पडले. सकाळचे फिरणे म्हणजे भरभर चालणे अशी माझी व्याख्या. त्यानुसार मी वेगानेच चालत होते. इतक्यात शेजारुन एक मुलगा विरुद्ध दिशेने चालत गेला आणि जाता जाता एक टिप्पणी टाकून गेला. मोठ्याने गाण म्हणाला तो. कोणत माहितीये? 'हिची चाल तुरुतुरु..' मी माझ्याच विचारात चालत होते. पण गाण्याची ती ओळ टाकून ज्या चपळाईने तो तिथून पटकन निघून गेला तेव्हा मला जाणवल की हे आपल्यासाठीच होतं. आणि जेव्हा मला हे जाणवल तेव्हा मी दोन सेकंद आहे त्याच जागी स्तब्ध उभी राहिले. म्हणजे यावर काही प्रतिक्रीया द्यावी का आणि काय द्यावी असा विचार मनात येऊन गेला पण लगेच पुढच्या क्षणी मलाच हसू आले. म्हणजे मी काय तिथेच फसकन हसले नाही..(काय राव तेवढं कळतकी मला!!) पण योग्य वेळी सुचलेल्या त्या योग्य टिप्पणीबद्दल मला मनापासून हसू येत राहिले. नंतर मी मैत्रिणींना हा प्रसंग सांगितला तेव्हा त्यांनीसुद्धा हसून त्या मुलाच्या 'प्रसंगावधाना'(presence of mind) चेच कौतुक केले(?)
एकदा असच 'अपने इलाके'मे फिरत होते. हिवाळ्यातले थंडीचे दिवस असल्याने अजून पुरत उजाडलं नव्हत. पण सकाळी फिरायला येणारया लोकांची पुष्कळ वर्दळ होती रस्त्यावर. माझ्यासमोरुन एक जोडप चालत येत होत. पण काहीतरी विसंगती वाटत होत. बायको अगदी सैनिकी थाटात लेफ्ट-राईट करत चालत होती. म्हणजे डावा पाय पुढे येई तेव्हा उजवा हातही पुढ़े अगदी डोक्याच्या वरपर्यंत. आणि नजर अगदी समोर. आणि नवरामात्र अगदी अंग चोरुन, अवघडून गेल्यासारखा चालला होता. आपल्या बायकोच हे असं चालण फारच विचित्र वाटून लोक आपल्याकडेच बघत नाहीयेत ना या विचाराने अस्वस्थ झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. मी म्हटल अहो काका कशाला एवढा विचार करताय.. सकाळच्यावेळी तरी मनसोक्तपणे फिरा सगळे ताण-तणाव ठेवा बाजूला! म्हणू दे कोणाला काय म्हणायचय ते! (हो पण मी मात्र हे मनातल्या मनात म्हटल. एक तर काका ओळखीचे नव्हते आणि त्यात काकूंचा पवित्रा आक्रमक होता. :P )
एकदा तळजाईची टेकडी उतरुन खाली येत होते तेव्हा माझ्यासमोर ४-५ जणींचे महिलामंडळ चालले होते. त्या सर्वजणी त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या. (विरुद्ध गट म्हणजे 'जानी दुश्मन' वगैरे नाही बर का. तर सध्या अनुपस्थित असलेल्या व्यक्तींचा गट.) आता मला हे कसे कळाले की त्या त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या? उत्तर सोपे आहे, त्यांच्या बोलण्यावरुनच समजले मला. ;) इतक्यात समोरुन आणखी ४ जणींचे महिलामंडळ आले. 'अय्या तुम्ही आत्ता खाली उतरताय म्हणजे खूपच लवकर आला असाल नाही का? आम्हाला सांगायच ना आम्हीपण आलो असतो.' समोरच्या गटातील एकजण म्हणाली. 'आम्ही रोजच एवढ्या लवकर येतो' अगदी ठसक्यात उत्तर दिल एकीने. मग दोन्ही गट आपापल्या दिशेने निघून गेले. पण पुन्हा गप्पांमधे विरोधी गटाचीच चर्चा. त्यावरुन समजले की आत्ता गेलेलाच त्यांचा विरोधी गट होता तर. सकाळी सकाळी तरी असल्या चर्चा टाळाव्यात नाही का. (पुन्हा मी हे मनातल्या मनातच म्हटले. हो उगीच धोका कशाला पत्करायचा.)
कधी एखादा आजोबांचा गट फिरत असेल तर त्यांच्या गप्पांमधून जगातल्या सगळ्या ठळक बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळे दोन-तीन दिवस पेपर वाचला नसेल तर त्या सगळ्या बातम्यांचा ऊहापोह तुम्हाला ऐकायला मिळेल. जस्ट फोलो देम फॉर समटाईम. :)
तळजाईच्या देवीच्या मंदिरामधला 'हास्यगट' मात्र माझ्यासाठी एक आकर्षणाचा भाग आहे. तिथे जमणारी बरीच मंडळी माझ्या आजोबांच्या वयाची आहेत. आधी थोडा प्राणायाम आणि मग मोठमोठ्यान हसण्याचा व्यायाम असा यांचा क्रम! मी मात्र जेव्हाजेव्हा या हसण्याच्या वेळी तिथे पोचते तेव्हा तिथ बसून त्या सर्वांच निरीक्षण करत रहाते. कृत्रिम का असेना पण हे हसू बाहेर पडल्यावर काहीतरी समाधान देऊन जात असावं. सगळ्या जबाबदारया, ताण यांचा निचरा होऊन रहातो आणि हलक होऊन उमललेल निरागस हास्य या आजोबांच्या चेहरयावर दिसत. नंतर त्यांच्या गप्पा कानावर येत रहातात. कोणाच्या मुलाचे/मुलीचे नुकतेच दोनाचे-चार झालेले असतात.. कोणाची मुल अमेरिकेत आहेत, तिथली त्यांची ख्याली-खुशाली.. कोणाच्या मांडीवर नुकतीच नातवंड खेळायला लागेलेली असतात.. कोणाच्या गावाकडच्या शेतीच्या गप्पा किंवा नुकत्याच गावाकडे झालेल्या जत्रेतल्या गमती.. अस बरच काही.एखादी लाही गरम केल्यावर तडतडते आणि नंतर फटकन फुटून अलगद फुलून येते. या मंडळींकडे पाहिल की असचं काहीस जाणवत. प्रत्येक कडू-गोड अनुभवातून अगदी तावून-सुलाखून बाहेर पडून, मग सगळ्या अनुभवांची शिदोरी जवळ ठेवून फुलून आलेल हे आयुष्य. त्यांच बोलण ऐकता ऐकता त्यातून पाझरणार चैतन्य, उत्साह, समाधान जाणवत रहात. मग मलाही फिरायला आल्याच समाधान वाटत. ते चैतन्य आणि उत्साह बरोबर घेऊन मग मीसुद्धा नविन दिवसाच्या तयारीला लागते. :):)
Monday, July 13, 2009
Tuesday, June 30, 2009
सर्दी... कुछ लेते क्यू नही?
दोन-तीन दिवसांपासून अगदी हैराण केलय या सर्दीने! एकदा सर्दी झाली की कमीतकमी चार दिवसांची पाहुणी असतेच. मग लवकर बरे होण्यासाठी कितीही औषध-पाणी करा, हिचा चार दिवसांचा मुक्काम ठरेलेलाच! आणि एकटी येत नाही हो.. डोकेदुखी, अंगदुखी-कणकण बरोबर बरोबर घेऊनच येते.
आक् छी.. excuse me... आ..आ..आक् छी.. exxxcuse me... आक् छी.. आक् छी.. आक् छी.. (मी नाही म्हणणार excuse me... जा.. :P)
माणूस कितीही धडधाकट,हट्टा-कट्टा असला तरी सर्दी झाल्यावर किती केविलवाणा दिसतो. नाही?
पूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात यायची, एक सर्दीने बेजार झालेला माणूस - त्याची ती केविलवाणी अवस्था बघून त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला विचारत असतात, 'कुछ लेते क्यू नही?' हम्म्म्.. आता असं कुछ लेके सर्दी पटकन जात असती तर काय..!
काहीतरी लिहाव असं वाटल उगाचचं, पण सर्दीने डोक इतक बधिर आणि सर्दीमय झालय की काही(चांगल)सुचतच नाहीये. मग सर्दीवरच चार ओळी लिहिल्या..
'हाय हाय हाय ये सर्दी,
है मौसम भी बेदर्दी,
तेरे नाक मे दम कर देनेसे,
मेरा सिर भी फुटा जाये...'
'हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी' या हिंदी गाण्याच्या चालीवर या ओळी छान बसतील! मूळ गाण्यातल्या 'मजबूरी'ची जाग 'सर्दी'ने घेतलीये. त्यामुळे कमी पडलेले दोन शब्द भरून काढण्यासाठी पहिल्या ओळीमधे आणखी एक 'हाय' टाकली. पण ही तिसरी 'हाय़' या सर्दीसाठीच आहे बरे! ...अरे देवा... मी हे मघापासून काय बरळतीये... सर्दीमुळे डोकं अजिबातच चालेनासं झालय. खरच आता 'कुछ तो लेके मै सो जाती'...
काही का असेना पण या सर्दीमुळे एक दिवसतरी खरीखुरी हक्काची 'Sick Leave' घेता येते. ;) :)
Wednesday, June 24, 2009
पाऊस....
पाऊस, मनातल्या आठवणींना भिजवून जातो. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा एक एक आठवणी बाहेर यायला लागतात. अगदी बालपणापासूनच्या..... डबक्यातल्या होड्या.. गारा वेचणं - तुझ्यापेक्षा माझ्याकडेच जास्त असं म्हणत पावसातच नाचणं, डबक्यात उड्या मारण, भिजण - भिजवण...... पाऊस सुरु व्हायचा तोच शाळा सुरु झाल्याची वर्दी देत! नवी पाठ्यपुस्तकं, नव्या वह्या.... त्या कोरया-करकरीत पानांचा वास अजूनही आठवतोय. नवा वर्ग, नवे वर्गमित्र, नवे शिक्षक.... मग बरयाचदा सुरुवात व्हायची ती - 'माझा आवडता ऋतू - पावसाळा'ने :)
वाढत्या वयाबरोबर पावसात भिजण्याचे वेडपण वाढलेले.... एकदा तर अचानक आलेल्या पावसाने क्लासपर्यंत पोचेतो चिंब भिजवून टाकलेले आणि आम्हा ३-४ जणींना असे क्लासच्या दारात पाहून सरांनी क्लासलाच सुट्टी दिलेली... आणि मग पुन्हा सायकलवरुन भिजत भिजतच घर गाठलेलं.....बालपणापासून, शाळा, कॉलेज आता ऑफीस, वयाची एकेक अंतरं पार केलेली, पण पावसाबरोबरचे असलेले हितगूज मात्र तेच.... मातीचा सुगंध (या सुगंधामुळेच लहानपणी मला पावसाळ्यात माती खायची खूप आवड होती :)).... पानाफुलांतून डोकावणारा ताजेपणा....कधी पावसात चिंब भिजण..... कधी झाडांना-पाना-फुलांना बिलगलेला पाऊस बघत रहाण...... तर कधी शांतपणे बाहेरचा पाऊस नुसताच ऐकत रहाण...... पावसावरच्या कविता, गाणी यांनी लावलेलं वेड...... वाढत्या वयाबरोबर पावसाबरोबरचे हे मैत्र अधिकच घट्ट होत गेलेले....
सांगण्यासारख खूप आहे, पण किती आठवणी सांगाव्यात? आता पूर्णविराम देतेच.. पण फक्त या लेखापुरताच कारण मनात भरुन आलेलं आठवणींचं आभाळ मात्र बरसल्याशिवाय निरभ्र व्हायच नाही.. :)
Thursday, June 18, 2009
एक(खरं तर अनेक) प्रश्नचिन्ह
लोक धर्माचे पालन करतात. पण धर्माचे पालन करता करता सहज अंधश्रद्ध होऊन जातात का आणि मग (अंध)श्रद्धाळू भाविकांच्या मनाचा ताबा घेऊन, त्याचेच भांडवल करुन पैसा कमावणारेही असतातच की!
आणखी एक अशाच प्रकारच पुस्तक मी पाहिल होत. त्यावर लिहील होत 'तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील' एका देवतेच चित्र त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते. तर त्याच लॉजिक अस होत की, तुमच्या आयुष्यातली एखादी समस्या/किंवा भेडसावणारा एखादा प्रश्न मनात धरायचा. मग त्या पुस्तकाचे शेवटचं पान उघडायच.(शेवटच्या पानावर चौकटींच्या रकान्यांमधे आकडे लिहिलेले होते) आणि कोणत्याही एका आकड्यावर बोट ठेवायच. ज्या आकड्यावर बोट असेल तो आकडा पुस्तकामधे शोधायचा आणि त्या आकड्यासमोर जे लिहिलेले असेल ते त्या समस्येचे उत्तर किंवा ती समस्या निवारण्याचा उपाय असणार.
??????????????????????????
थोड गोंधळल्यासारख झालय मला. म्हणजे श्रद्धा-अंधश्रद्धा या बाबी एका बाजूलाच राहील्या, पण मग हे काय चाललय? आणि ते चालवून घेतल जातय म्हणून चाललय.... मला नुकतच वाचलेल्या शोधयात्रा या पुस्तकातील 'हा' उतारा आठवला.
हम्म्.. या गोष्टीवर विचार करावा तेवढ थोडच आहे.. आय नीड अ ब्रेक नाउ...
Monday, June 15, 2009
काही निवांत क्षण...



Wednesday, April 15, 2009
रुकावट के लिये खेद है|
एकदा काही कारणाने रात्री मी हा कार्यक्रम पाहू शकले नाही. अनायसे दुसरया दिवशी सुट्टी होती, त्यामुळे दुसरया दिवशी दुपारी याच पुनःप्रक्षेपण पहायच अस मी मनाशी बजावून ठेवलं.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आमच्या इमारतीमधे 'वाळवणं' हंगाम सुरु आहे. म्हणजे भातवड्या,पापड, कुरडया इ.इ. करण्याची तयारी सुरु आहे. आता कधी, कसं, काय करायचं याची चर्चा करायला शेजारच्या काकू घरी आल्या होत्या. (अर्थातच ही चर्चा त्या आईबरोबर करणार होत्या.) स्वयंपाकघरात त्यांची चर्चा सुरु होती आणि मी बाहेर मस्तपैकी 'झी'वरच्या गाण्यांच्या मैफीलीचा आनंद घेत होते. इतक्यात काकू बाहेर आल्या, माझ्याशेजारी येऊन बसल्या. समोर नुकतच एक छान गाण सुरु होत होतं. मी कान देऊन ऐकत होते. आणि इकडे काकूंना माझ्याशी बोलायची हुक्की आली होती. 'अगं मी हा कार्यक्रम कालच पाहिला. छान झाल हे गाणं.'(हो का! मग आता मला ऐकू द्या ना - इति मी मनातल्या मनात) गाण्यावरून मग काकूंची गाड़ी दुसरया विषयाकडे वळली. 'अग आमची ही ना आता अमुक एक कोर्स करणार आहे. अमक्या ठिकाणी जाते अभ्यासाला. तमक्या ठिकाणी प्रयत्न सुरु आहेत इ. इ.' अशी काकूंची बडबड सुरुच! मी शक्य तेवढे सोज्वळ हसू चेहेरयावर आणण्याचा प्रयत्न करत होते आणि 'हो का', 'बरं' असे शब्द मधेमधे फेकत होते. माझे कान गाण्याकडे आणि डोळे काकूंकडे होते. (म्हणजे मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाही हा त्यांचा समज जपण्याचा प्रयत्न करत होते) गाण सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत त्या एकसारख्या बोलत होत्या. आणि ज्या क्षणाला गाण संपल त्या क्षणाला त्या उठून आत गेल्या. म्हणजे त्यांच बोलण संपल म्हणून त्या आत गेल्या. आता मला सांगा नाही का होणार माझी चिडचिड? नेमक गाण्याच्या वेळेतच तेवढी रुकावट निर्माण झाली होती. आता तुम्ही म्हणाल एक गाण तर होत ना मग ते काय कधीही ऐकता येईल की एवढं चिडायचय काय त्यात? ठीक आहे पण जेव्हा समोर कुणी कसलेला कलाकार एखाद आपल्या आवडीच गाण गात असेल तर अशावेळी ऐकायला छान वाटतं. त्यातून माझी गाण्याची आवड तर काकूंना माहितच आहे. असं असताना तरी निदान...! जाऊ देत आता काय बोलणार! इस रुकावट के लिये भी खेद व्यक्त करने के सिवा और क्या कर सकते है....
Wednesday, March 18, 2009
मै और मेरी तनहाई....
एकांत माझ्याशी खूप बोलतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो, माझ्याबरोबर हसतो, परिस्थितीला पर्याय सुचवतो, एखाद्या गोष्टीवर विचार करण्याचा नवा दृष्टिकोन देतो, गोंधळलेल्या मनाला समजावून घेतो आणि योग्य ती समजही देतो. डोकं शांत होतं. मनातले प्रश्न मागे टाकून पुढे पळणारया आयुष्याला क्षणभर विसावा मिळतो, स्थिरता मिळते. खूप छान मोकळ वाटतं. पुन्हा नेहमीच्या धावत्या चाकावर स्वार व्हायला मन तयार होत.
जेव्हा मानसिक गरज असते तेव्हा जरूर एकांतात रहाव. हो पण सारख सारख नाही बरं का! :)
बाथरूम सिंगर्स....
एखाद गाण ऐकल, आवडल की ते गुणगुणावसं वाटत, कधी मोठ्याने म्हणून बघावसं वाटत. मग घरात गायला लागलं की असतातच आमचे छोटे बंधुराज, चित्र-विचित्र हावभाव करत, मी किती छान(?) गातीये याची पोचपावती द्यायला. :) एखादं नवं वा जुनं गाण प्रत्येकालाच आवडतं. आवडण्याची कारण वेगवेगळी असू शकतात. कधी गाण्याचे बोल आवडतात, कधी पार्श्वसंगीत आवडत तर कधी गाण्याची 'हटके स्टाईल' आवडते. मग ते गाण आपण नकळत गुणगुणायला लागतो. पण गुणगुणण्याची वारंवारता आणि आवाज वाढला की आजुबाजूच्या लोकांची बोटं कानात जायला लागतात :( मग गाणारा आवाज कमी व्हायला लागतो. गाण्यासाठी बाहेर पडू बघणारा हा दबलेला आवाज, बाथरूममध्य़े शिरल की गळ्यातून बंड करून बाहेर पडतो. तशी मीहि एक बाथरुम सिंगरच.. बाथरुमची ती १0 x ४ ची जागा म्हणजे गाण्यासाठी मिळालेलं हक्काच व्यासपीठ आहे माझ्यासाठी! पण आतून गाण्याचा आवाज यायला लागला की बाहेरुन जोरजोरात दार वाजायला लागत, 'लवकर आवरा, ऑफीसला जायला उशीर होतोय, गाणी नंतर म्हणा'- इति मातोश्री. पण काय करणार हाडाच्या बाथरुम सिंगरला गाण म्हटल्याशिवाय स्वस्थ कस बसवेल! :)
आम्ही नवीन फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हाची गोष्ट. इथे सगळेच लोक नवे होते. नुकतीच ओळख व्हायला लागली होती. इथे प्रत्येक मजल्यावर ४ फ्लॅटस. मधे एक मोठा पॅसेज आणि त्याच्याकडेने एका बाजूचे सगळे फ्लॅटस एकाखाली एक. सुरुवातीला गाण्यासाठी बाहेर पडणारा आवाज मी प्रयत्नपूर्वक शांत ठेवला. कारण मधे रिकामा पॅसेज असल्यामुळे, गायला सुरुवात केली की तो आवाज आमच्या फ्लॅटच्या बाजूला असलेल्या, वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या फ्लॅटसमधे पसरणार होता. आणि न जाणो माझा आवाज सहन न होऊन कोणीतरी तक्रार करायला घरी आल तर..! पण अस किती दिवस चालणार होत? शेवटी एकदा हा आवाज फुटलाच! मनसोक्तपणे मोठ्याने गाणी म्हणून घेतली. नंतर ऑफीसला निघायच होत त्यामुळे आवरण्याची गडबड सुरु होती. इतक्यात माझा भ्रमणध्वनी वाजला. त्याच्या आतल्या कप्प्यामधे(इनबॉक्स)संदेश आला होता. आलेला संदेश वाचता वाचता मला हसू यायला लागल.संदेश होता - 'गुड सॉंन्ग. वन्स मोरं' खालच्या मजल्यावरच्या काकूंनी माझ्या गाण्याला दिलेली दाद होती. :) ते वाचून मलाही मजाच वाटली. बाथरुम सिंगर्सनासुद्धा गाण्याची पोचपावती मिळते तर! आता तर माझ हे गाण्याच वेडं सगळ्यांनाच माहीत झालय. बरेच दिवस गाण ऐकू आल नाही की काकू विचारतात, 'काय अपर्णा कुठे आहेस? तुझ गाण ऐकल नाही बरेच दिवस.' ;) इतकच नाही तर आमच्या इमारतीमधे बाथरुम सिंगर्सची संख्यापण वाढलीये. :) आपणही गाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि असं गाताना किती आनंद मिळतो हे सगळ्यांनाच कळायला लागलय.
आत्ता हे लिहीत असताना मी एक मस्त गाणं ऐकतीये.. 'ए मस्सकली मस.. मसकली उड मट्टकली मट्टकली....' मोहित चौहानची गाण्याची अदा आवडली मला :) आणि या गाण्याच्या या ओळी मला जास्तच आवडल्या -
'उडियो न डरियो कर मनमानी मनमानी मनमानी....'
चालू देत गाण्याची मनमानी... :)
Tuesday, March 3, 2009
एक छोटीसी बात..
Friday, February 27, 2009
येशील का परतून कधी?
भरशील का रंग स्वप्नात माझ्या
मिटल्या डोळ्यात दाटले पाणी,
बांध हा पुन्हा रोखशील का कधी..
मूक ओठात हरवले शब्द,
माग तयान्चा घेशील का कधी
लोपलेल्या सुरान्चे,
कोमेजलेल्या कळ्यान्चे,
देणे देशील का कधी
परतून येशील का कधी...
परतून येशील का कधी..?
Tuesday, February 24, 2009
वादळवाट - शीर्षकगीत
थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले.
कधी उतरला चन्द्र तुझ्या-माझ्या अंगणात,
स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत.
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदी काठ
कधी हरवली वाट...
वारया-पावसाची गाज,
काळी भासे गच्च दाट.
कधी धुसरं धुसरं,
एक वादळाची वाट..
- मंगेश कुलकर्णी
ऐकलय हे गाण? अजूनपर्यंत नसेल ऐकल तर जरुर ऐका.
रुळलेल्या वाटा आणि पोळलेली मने...
लहान असताना, एक प्रश्न मला बरयाचदा विचारला जायचा, 'काय मग तू मोठेपणी कोण होणार?' मी फारसा विचार न करता सांगायचे 'मी डॉक्टर होणार.' अस मी का सांगायचे हे मला त्यावेळी सांगता नसते आले. कदाचित 'डॉक्टर' होण हे मला एक प्रतिष्ठेच लक्षण वाटायच. पण मग मला हे समजल कुठून? मोठ्या लोकांच्या गप्पांमधून? अमक्याचा मुलगा डॉक्टर झाला, तमक्याची मुलगी इंजिनिअर झाली. नाव काढल हो पोरांनी.' त्यांना मिळणारा भाव पाहिल्यावर, स्वतःहालाही अशाच भूमिकेत जगासमोर मांडल्यावर आपणही चांगले नाव कमावल्यासारखे होईल अशी माझ्या मनाची समजूत झाली असणार. नक्कीच!
खरच डॉक्टर, इंजिनिअर याच ठराविक वाटा आहेत का चांगल करिअर घडविण्याच्या? इथे मी, या करिअरमधे असणारया किंवा करिअर घडवू पहाणारयांकडे बोट दाखवत नाहीये. तर मला असं म्हणायचय की लहानपणी मूल जेव्हा घडत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट त्याच्या मनावर बिंबवण्यापेक्षा, त्याच्या मनाचा नैसर्गिक कल जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच करिअर घडल तर ते खरया अर्थाने त्याला आयुष्यभर समाधान देत राहील.
'job satisfaction' ही संज्ञा कुठून आली? आज मी कितीतरी मुला-मुलींना पहाते,इंजिनिअरींगची डिग्री घेऊन चांगल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी करतायत. पगारही चांगला आहे! पण नोकरीमधे समाधानी नाहीत. नोकरीची सुरूवातीची वर्षे नव्या नवलाईमुळ छान वाटतात. पण नंतर जेव्हा जाणवायला लागत की या नोकरीमधे स्वतःचा interest/liking कमी आहे, तेव्हा मन अस्वस्थ व्हायला लागत. मग जाणवत की आपण हे करिअर निवडताना 'मनाचा कौल' घेतलाच नाही. केवळ रूळलेल्या वाटेवरून चालत गेलो. आपण ज्याप्रकारची नोकरी करतोय तिथे आपल्यामधे असलेलं potential/talent पुरेपूर वापरल जात नाहीये. ही जाणिव सतत टोचत रहाते. अशावेळी काहीजण PG करायच ठरवतात. पण यावेळीमात्र निर्णय डोळसपणे घेतला जातो. PG कशात करायच? का करायच, कुठे करायच, माझा interest कशामधे आहे इ. पुन्हा पहिले पाढे गिरवायचे नसतात ना म्हणून!
काहीजण मी असेही पाहिले आहेत, ज्यानी चांगल्या पगाराची/हुद्द्याची नोकरी सोडली. प्रमुख कारण म्हणजे No job satisfaction. आणि नंतर पूर्णवेळ प्रशासकीय सेवेत जाण्याची तयारी सुरू केली. त्यामधे ते यशस्वीसुद्धा झाले. अशाप्रकारे नवीन मार्ग शोधून तिथे आपले बस्तान बसविणारे नक्कीच समाधानी होतात. पण ज्यांना दुसरा मार्ग सापडत नाही किंवा सापडला तरी परिस्थितीमुळे तो मार्ग निवडणे त्यांना शक्य होत नाही त्यांच काय? अस नाही की ते आयुष्यात यशस्वी नसतात. पण जर job satisfaction नसेल तर potential असूनही ते १००% देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य खूप मेकॅनिकल होऊन जात का? (Rock On मधे फरहान अख्तरने जे character केलय तसं).
काही लोक असतात ज्यांना खूप लवकर समजत की त्यांना आयुष्यात पुढे काय करायचय. पं. भीमसेन जोशी हे असच एक व्यक्तिमत्त्व आहे. किती लहान वयात त्याना समजल होत की 'मला शास्त्रीय संगीत शिकायचय'. त्यावेळी गाण्यात करिअर घडवायच वगैरे असे विचारही त्यांच्या मनात आले नव्हते पण स्वतःची गाण्याची आवड त्याना कळाली होती. आणि पुढे त्यांची घडलेली कारकीर्द आपल्याला माहीत आहेच. अशा व्यक्ती खरच खूप भाग्यवान असतात.
हल्लीची मुले करिअरच्याबाबतीत अगदी चोखंदळ आहेत. दहावी-बारावीची परीक्षा देत असतानाच त्यांचे PG कशात करायच आणि कुठे करायच इथपर्यंतचे planning झालेले असते. पालक आणि मुलांनी करिअर निवडताना संवेदनक्षम राहिल तर पुढे कोमेजणारया/पोळणारया मनांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
Sunday, February 22, 2009
किती बडबड सुरू आहे....
बरयाचदा बोलण ही माणसाच्या स्वभावाची गरज होऊन जाते. म्हणजे जेव्हा मनावर एखाद्या गोष्टीचा ताण असतो किंवा मनात एखादे द्वंद्व सुरू असते, अशावेळी आपलं मन स्वतःशीच संवाद साधत रहातं. पण जेव्हा आपण हा ताण, हे द्वंद्व कोणाजवळतरी बोलून दाखवतो, तेव्हा खरचं खूप हलक वाटतं. भलेही त्यावेळी त्य परिस्थितीतून मार्ग मिळतोच असं नाही पण नक्कीच मनावरचा भार अंशतः तरी कमी होतो.
कधीकधी आपण अनुभवलेली एखादी गोष्ट किंवा एखाद्या विषयाबद्दलचं आपल ज्ञान, आपली मतं यांची चर्चा करावी अस वाटत किंवा आपली विचारसरणी कुठेतरी पडताळून पहावी अस वाटत. अशावेळी ऐकून घेणारी कोणी व्यक्ती असेल तेव्हा तिच्यासमोर आपण भडभडून बोलतच रहातो. अगदी समोरच्या व्यक्तीलाही आपल्या बोलण्यातला उत्साह जाणवेल इतके आपण भारावल्यासारखे (fully charged होऊन) बोलतच रहातो. :)
खरच 'बोलण' हे माणसाला अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी मिळालेलं एक साधन आहे. त्याचा योग्य वापर करण हीदेखील एक कलाच आहे!
Wednesday, February 18, 2009
म्युझिक मस्ती आणि (गणपती) डान्स!!!
डान्स करायला कोणाला आवडत नाही??
मला वाटत की प्रत्येकाला डान्स करायला आवडत पण जसजसं वय वाढेल तसतसं आपल्या आत असलेला 'डान्सर' लोप पावत जातो. प्रत्येकाला अगदी 'हृतिक' सारखा छान डान्स जमेलच अस नाही. तसा अट्टहासही नाही. पण संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला प्रत्येकाला येत. आपल्या आत असलेली डान्स करण्याची ऊर्मी बाहेर पडायला तेवढ पुरेसं आहे. :) मलाही नाचायला खूप आवडत. लहान असताना शाळेत गॅदरिंगमध्ये नाच, नाटक यात भाग घ्यायचे. पण कॉलेजला गेल्यावर नाचायची सन्धीच मिळाली नाही. :(
डान्सचे सगळेच प्रकार छान असतात. पण मला विशेष आकर्षण वाटत ते 'गणपती डान्स'चे! आता 'गणपती डान्स' म्हणजे काय हे सान्गायची गरज आहे अस मला तरी वाटत नाही. पण तरीही ज्याना माहिती नाही त्यांच्यासाठी - 'कोणीही आपल्याकडे बघत नाही अशी मनाची समजूत घालून, कानावर पडणारया संगीताच्या बोलावर/तालावर मनसोक्तपणे हात-पाय हलवत नाचणे' म्हणजे 'गणपती डान्स'!!गणेशोत्सव मला आवडतो याच मुख्य कारण म्हणजे माझा लाडका देव 'गणपती' आणि दुसर कारण म्हणजे 'गणपती डान्स'. गणेशोत्सवाचा पहिला आणि शेवटचा दिवस म्हणजे सगळ्या डान्सर्रसना पर्वणीच असते. मिरवणुकीत नाचणारे अगदी बेभान होऊन नाचत असतात. तो नाच बघण म्हणजे निव्वळ मनोरंजन असते. अर्थातच, मी काही मिरवणुकीत जाऊन नाचत नाही.(याबद्दल मला नेहमीच वाईट वाटत, की मी मुलगा का नाही झाले :( ) साधारण ८ ते १०वी मधे असताना, मिरवणूक बघायला लागले की नाचणारयांचा जोश पाहून मलाही संचारल्यासारख व्हायच. मग बाहेर चाललेल्या मिरवणुकीच्या तालावर माझा घरामधे 'गणपती डान्स' सुरु व्हायचा. आणि माझा डान्स बघण्यासाठी एकमेव प्रेक्षक म्हणजे माझी आई! ती आपली माझा डान्स बघून हसत बसायची. मिरवणूकीत जी गाणी लावतात त्यांच म्युझिकच अस असत की ते तुम्हाला ताल धरायला लावत. काही गाणीही अशी असतात की ती कानावर पडली की अंगात नाचाच वार संचारतच बघा! अशी गाणी तयार करणारया संगीतकारांच आणि गीतकारांच कौतुक नक्की कराव लागेल. काही गाणी like 'कोंबडी पळाली..', सन्दीपच 'ढिपाडी ढिपांग..', 'धूम मचाले..', 'अब के सावन ऐसे बरसे..'(शुभा मुदगल्)(या गाण्याच्यावेळी पाऊस पडत असला तर मग काय आणखीनच मजा!), 'चमचम करता' ,'मौजाहि मौजा', 'हम्मा हम्मा','के सेरा सेरा', 'देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार..' अशी कितीतरी गाणी सान्गता येतील.
तर या नाच करण्याच्या मोहापायी एकदा एक गम्मतशीर किस्सा घडला. एकदा संध्याकाळी ८.३०-९ च्या सुमारास सगळीकडे लाइटस गेले होते. इतक्यात कुठूनतरी जोरजोरात लाउडस्पीकरवर गाण्याचे आवाज ऐकू यायला लागले. काय आहे ते बघण्यासाठी मी आणि माझी बहीण टेरेसवर गेलो. शेजारच्या गल्लीमधे कोणाच्यातरी घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. तिथे generator सुरु असल्याने गाणी सुरु होती. बाकी कुठेच लाइटस नव्हते. टेरेसवरही अन्धार होता. मग काय तिथेच 'गणपती डान्स' सुरु केला. :) अगदी हवे तसे हात-पाय हलवत, धुन्द होऊन आमचा नाच सुरु होता. साधारण १०-१५ मिनिटे आम्ही नाचत होतो. इतक्यात शेजारच्या टेरेसवर हालचाल दिसली. मी थोडे थांबून, डोळे बारीक करुन पाहिल तर काय??? तिथे काही लोक बसले होते आणि ते आमच्याकडेच बघत होते!!! अन्धारात आम्हाला काही दिसलच नव्हत. माझी बहीणपण तोपर्यंत भानावर आली होती. आम्ही काहीही न बोलता तिथून धूम ठोकली. खाली आल्यावर आम्हाला काय कराव/बोलाव ते सुचतच नव्हत. तो शॉक पचायला थोडा वेळ गेला. नंतर मात्र आम्ही दोघी पोट धरून हसत होतो. :) आमचा नाच बघणायरयांचही 'free entertainment' झाल होत :). तर अस हे नाचाच वेड!!
पण हल्ली नाच खूप मागे पडलाय. नाचाची आवड प्रत्येकाला असली तरी मिरवणूकीत जाऊन नाचणे प्रत्येकालाच शक्य नसते. बरयाचदा तिथे manners/status असे अवघड शब्द आडवे येतात. मग ही नाचाची आवड, ही ऊर्मी पूर्ण कशी करायची? म्हणूनच का हल्ली disc,pub ची संस्कृती वाढू पहातीये?मोकळेपणाने नाच करण वेगळ असत. नक्कीच तुम्हाला relaxed वाटेल. पुन्हा charge झाल्यासारखे वाटेल. पण नाचाच्या नावाखाली चालणारे विक्षिप्त प्रकार मात्र अजिबात समर्थनीय नाहीयेत. 'मनमोकळेपणाने नाचणे' आणि 'नैतिकता सोडून नाचणे' यात नक्कीच फरक आहे. कारण status/manners च्या नावाखाली जर मिरवणूकीत नाचण टाळलं जात तर नीतिमत्ता सोडून पबमध्ये नाचण कितपत योग्य आहे? अर्थातच मिरवणूकीत दारू पिऊन झिंगणारयांचही मी समर्थन करणार नाही.
शरीर आणि मन ताजतवान करण्यासाठी नाचा. बाकीचे चोचले पुरवण्यासाठी नको. प्रत्येकाने स्वतःमधला 'डान्सर' जिवंत ठेवला पाहिजे. संगीताच्या तालावर ठेका धरुन हालणारे हात-पाय रोखू नका. चार-चौघात लाज वाटते? मग एकट असताना नाचून बघा. पण ही ऊर्जा ओघवती ठेवण्याचा प्रयत्न जरूर करा!
Keep dancing...
Cheers. :):):)
Tuesday, February 17, 2009
गाना मेरे बस की बात नही|
चित्रपटांसाठी गाणी लिहीणारया ग़ीतकारांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. अर्थातच, अर्थपूर्ण गाणी लिहिणारया गीतकारांबद्दल! म्हणजे एक विशिष्ट प्रसंग आहे, त्याला अनुसरुन गाण लिहायचय. गाण्यातून तो प्रसंग, त्याला साजेशा भावना व्यक्त करण हे किती छान जमत या लोकांना!
कधी कधी योगायोगानेच म्हणा, वास्तविक आयुष्यामधे काही प्रसंग घडत असतो आणि नेमक त्याच वेळी, त्या प्रसंगाला साजेस अस गाण (रेडिओ, टेप किन्वा टि.व्ही. वर) सुरु होत. 'A right song at right time' ;). अशावेळी त्या प्रसंगाची स्थिती बदलूही शकते. उदाहरण द्यायचे झाले तर,
- समजा एखादी व्यक्ती खूप टेन्शनमधे आहे, नेमक त्याच वेळी गाण, लागल 'मितवा सुन मितवा, तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है, अपना अम्बर है रे' झाल, त्याच टेन्शन थोड तरी का होईना किन्वा त्या वेळेपुरत तरी कमी होईल :).
- नुकतच वयात येत असलेला एखादा मुलगा. त्याला कोणीतरी मुलगी आवडायला लागलीये.तो कॉलेजमधून घरी आलाय आणि इतक्यात रेडिओला गाण सुरु झाल, 'पहला नशा, पहला खुमार...' मग काय साहेब एकदम स्वप्नांच्या दुनियेत ;)!!!
- Graduation/PG पूर्ण झाल्यावर convocation ceremony सुरु आहे. विद्यार्थीदशेतून बाहेर पडणारया प्रत्येक मुलाला/मलीला भावी आयुष्याची स्वप्न खुणावतायत. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक नव पर्व सुरु होत आहे. अशावेळी गाण सुरु होतय, 'लिये सपने निगाहोंमे चला हू तेरी रहोंमे, जिन्दगी, आ रहा हू मै' :)
- एक मुलगी जिच्याघरी आता तिच्या उपवर होण्याची चर्चा सुरु आहे. ती हे सगळ ऐकतीये आणि गाण लागतय, 'हमको आजकल है इन्तजाSSSर, कोई आये लेके प्याSSSSर'
- एखादा आयुष्यात खूप दुःखी झालाय, आणि नेमक गाण लागलय 'मेरा जीवन कोरा कागज...' अम्म्.....नको नको हे गाण नको. ते त्याला आणखी उदास करेल. अशावेळी लागाव, 'ऐ जिन्दगी गले लगाले, हमनेभी तेरे हर एक गम को गलेसे लगाया है, है ना' हे गाण नक्कीच त्याच्या मनात एक आशेचा किरण जागा करेल! :)
- तरूण मुला/मुलीन्ना बरयाच वेळा घरी-दारी काहीतरी उपदेशाचे डोस सुरु असतात. पण समजा एखाद्यावेळी हा डोस जरा जास्तच व्हायला लागला आणि ऐकणारा आता पूर्णपणे पकलाय. गाण लागतय 'ए हटा सावन की घटा...' :) यावेळी बोलणारयाला नाही पण ऐकणारयाला मात्र मनापासून हसू येईल. पण तोही मनातल्या मनातच हसेल. नाहीतरदुसरा डोस सुरु व्हायचा!!
- एका नातवाची आजी त्याच्यावर रागावून रुसून बसलिये आणि नेमक गाण सुरु झाल, 'दादीमा दादीमा, प्यारी प्यारी दादीमा, देखो जरा इधर देखो गुस्सा छोडो दादीमा' नातवाने आजीकडे पाहिले, दोघांची नजरा-नजर झाली,आजीची कळी खुलली आणि राग कुठल्या कुठे पळाला!
- एखादा मजनू त्याच्या लैलाला पटवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण ती मात्र त्याला भाव देत नाहीये. कुठल्याशा प्रसंगाने ते अचानक एकमेकांसमोर आले आणि नेमक ग़ाण सुरु झाल, 'दर्दे दिल दर्दे जिगर, दिलमे जगाया आपने..' मजनू तर एकदम खूश होऊन जाईल. त्याला तर हेच हवे होते. ;) पण लैलाची काय अवस्था होईल? तिला बिचारीला कुठे पळून जाऊ अस होईल!
- एखादीच लग्न ठरलय, घरी मेहेन्दीचा कार्यक्रम सुरु आहे, गाण लागतय, 'फुलले रे क्षण माझे फुलले रे..'
- लग्न उद्यावर आहे. वडिल आणि उपवर मुलीचा संवाद सुरु आहे. नेमक गाण लागत, 'दाटून कंठ येतो..' दोघानाही एकदम गहिवरून येतं, दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटलय. भावना एकमेकांपर्यंत पोचल्यात. आता बोलायच काहीच नाही. लेक बाबांच्या गळ्यात पडते आणि दोघेही अश्रूंना वाट मोकळी करून देतात. बस्स बस्स.. फारच emotionally touchy moment सुरु आहे.
तर मला म्हणायच अस की गीतकार जी गाणी लिहितात ती फक्त त्या विशिष्ट चित्रपटातल्या विशिष्ट प्रसंगापुरतीच मर्यादित नसतात. तर त्यातल्या भावभावना generalised असतात. म्हणजे त्या भावभावना तुमच्या-माझ्या आणि जवळ जवळ सगळ्याच (normal) माणसांच्या भावनांच सादरीकरण करतात. या गीतकारांना नेमके शब्द सुचतात तरी कसे? अस वाटत मला कधी जमेल का अशी गाणी लिहायला? नाही म्हणायला शब्द, यमक जुळवून कविता लिहिण्याचा प्रयत्न जरुर करते. पण आम्हा पामराला अस छान लिहायला कुठे जमतय? शेवटी सरड्य़ाची धाव कुंपणापर्यंतच!(इथे मी उदाहरणादाखल ही म्हण वापरलीये. याचा अर्थ असा होत नाही की मी सरडा आहे.) पण गीतकारांकडे ही प्रतिभा उपजतच असते.
Hats off to गुलजार, जावेद अख्तर, प्रसून जोशी (my fav) आणि त्यांच्या या प्रतिभेलाही सलाम! सध्यातरी 'गाना (लिखना) मेरे बस की बात नहीSS'
मेरी fattyness/fitness से मेरी उम्र का पताहि नही चलता!
माझ उत्तर आहे, 'हो, खुप महत्त्व आहे.' म्हणजे बघा, काही सुप्रसिध्द म्हणी/सुविचार मी उदाहरणादाखल देते. 'Health is Wealth' ( उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे.), 'Early to wake & early to rise, makes man healthy, wealthy & wise'. म्हणजे फक्त wealthy आणि wise असण पुरेस नाहिये. 'Health' नावाचा दागिना असेल तर व्यक्तिमत्त्व जास्त खुलुन दिसत. हे सगळ प्रास्ताविक करण्याच कारण म्हणजे मला माझे काही 'फिटनेस'चे अनुभव सान्गायचे आहेत.
इन्जिनिअरिन्गच्या ४ वर्षात माझ्या तब्येतीत बरीच प्रगती झाली! म्हणजे आधी जर मी खात्या-पित्या घरची वाटत असेन तर आता 'अति'-खात्या आणि 'अति'-पित्या घरची वाटायला लागले होते. सहाजिकच नातेवईक आणि मित्र-मैत्रिणीन्कडून त्याची पोचपावती मिळत होतीच मला! घरात माझ्या भावाशी माझ भान्डण झाल आणि आमची बाचा-बाची सुरु झाली की मला गप्प बसवायला त्याला एक छान उपाय मिळाला होता. मी काही बोलायच्या आतच तो म्हणायचा की 'आधी स्वतःकडे बघा आकार कुठे चाललाय ते! वाढता-वाढता वाढे, भेदिले शून्य मन्डळा!' आता दुखणारी नस दाबली गेल्यावर काय, मी पण गप्प बसायचे. पतन्ग उडवण्याचे दिवस असले की तो मला 'झब्बू' पतन्ग म्हणून चिडवायचा! बाबा मला पूर्वीही सान्गायचे पण आताही(जास्त intensly) सान्गू लागले, 'बेटा, सूर्यनमस्कार हा सर्वान्गसुन्दर व्यायाम आहे. रोज करत जा.' यातला मतितार्थ आपण समजून घ्यायचा- 'आपल अन्ग सुन्दरपणाच्या सीमा ओलान्डून चाललय, त्याकडे जरा लक्ष द्या.' तसा व्यायामाबद्दल मला आदर आहे पण तो करायचा म्हटल की 'आळस' नावाचा माणसचा शत्रू माझ्या इच्छाशक्ती(?) वर मात करायचा.
एकदा असच मी खरेदीसाठी फिरत असताना एक गजरे विकणारा छोटा मुलगा माझ्या समोर आला आणि म्हणाला, 'क़ाकू गजरा घ्या ना'. (काकू? मी? नहीSSSSS!! अरे अजून माझ लग्नपण नाही झाल.) नन्तर एकदा मला बेळगावला माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जायच होत. एस्.टी. ची चौकशी करण्यासाठी मी कण्डक्टरकडे गेले. तो म्हणाला, 'वहिनी, तुम्ही समोरच्या एस्.टी. मधे जाऊन बसा.'(काSSSय? वहिनी? This is too much Aparna, आता तरी हात-पाय हलवा.)
नन्तर जेव्हा नोकरीला लागले तेव्हा नाही म्हटल तरी धावपळ व्हायचीच, पण एवढ असूनही वजनाचा काटा काही हलत नव्हता! माझी आई मात्र मधेच तोन्डावर हात फिरवून म्हणायची, 'पोर किती सुकलीये कामाने'(आईच काळीज, काळजी करणारच!). पण आता मात्र मी मनावर घेतल होत. रोज सकाळी नियमितपणे व्यायाम सुरु केला. हा आता अधुन मधून तो माणसाचा शत्रू (आळस त्याचे नाव) डोक वर काढायचा, पण माझी इच्छाशक्ती त्यावर मात करायची. थोडे दिवसानी gym ला जाऊ लागले. रोज न चुकता १-१.३० तास व्यायाम करायचे. सुरुवातीला थोडा-थोडा व्यायाम करायचे पण नन्तर व्यायामाची आवड आणि stamina जसजसा वाढत गेला तसतसा व्यायामासाठीचा वेळही वाढत गेला. रोज trademillवर पळताना जाणवायच की कालच्यापेक्षा मी आज जास्त अन्तर पळाले किन्वा situps करताना जाणवायच कि आज count वाढलाय. रोज असा शरीर पिळवटून टाकणारा व्यायाम झाला आणि अन्गावर निथळणारा घाम पाहिला कि छान वाटायच. मी स्वतःवरच खुश व्हायचे. पण हो, एक मात्र आवर्जून सान्गेन,व्यायाम करत होते पण कधी 'diet'च्या नादाला नाही लागले. जमणारच नाही हो! समोर छान-छान पदार्थ दिसत असताना 'diet'च्या नावाखाली जिभ आवरती घेण आमच्या तत्त्वातच बसत नाही! तर आता हे व्यायामाच अस एक छान routine सुरु झालय. आता अगदी मी adict झालीये व्यायामाच्या सवयीची, अस म्हटल तरी चालेल.
हे अस सुरु असताना, पूर्वी मला जे अनुभव आले त्याच्या अगदी उलट अनुभव यायला लागले.खूप दिवसानी कोणी नातेवाईक/मित्र-मैत्रीण भेटले की म्हणायचे 'बारीक झालीस ग, काय करतेस?'
एकदा आईच्या एका मैत्रिणीकडे गेले होते, तर तिथे आलेल्यान्पैकी एकीने मला विचारले 'तू कोणत्या शाळेत आहेस?'(This was too much. तिच्या चष्म्याचा नम्बर वाढला असावा कारण एव्हढी बारीक मी नक्कीच नाहिये.) काही compliments अशाही मिळाल्या. 'काय अपर्णा, आणखी किती बारिक होणार, पुरे आता. काय करिष्मासारख '०' figure व्हायचाय का!' (आता या compliment देणारयाविषयी सान्गायच झाल तर - अशी व्यक्ती जी स्वतः जाड आहे. त्याची तिला जाणीवदेखील आहे, पण व्यायामाचा कन्टाळा. 'diet' तर नाहिच नाही.)
असो! तर या आणि अशा प्रकारच्या comments/compliments ऐकताना अन्गावर मूठभर मांस चढणार नाही याची काळजी मी घेत आहेच. पण राहून राहून मला दूरदर्शनवरची ती सन्तूर साबणाची जाहिरात आठवते. 'मेरी त्वचासे मेरी उम्र का पताही नही चलता' ! पण इथे मात्र आधी अस होत कि 'मेरी मोटापेकी वजहसे मेरी उम्र का पताही नही चलता'आणि आता अस आहे की मेरी fitness कि वजहसे मेरी उम्र का सही पता चलता है'