Thursday, June 18, 2009

एक(खरं तर अनेक) प्रश्नचिन्ह

गेल्या आठवड्यात एस्.टी. ने गावी निघाले होते. स्थानकावर तशी गर्दी ही नेहमी असतेच. एस्.टी. सुद्धा एकदम 'फुल्ल' होती. सगळे प्रवासी स्थिरस्थावर होत होते. इतक्यात फेरीवाल्या विक्रेत्यांच्या फेरया सुरु झाल्या. काही ठराविक वस्तूंचे विक्रेते तर अशा सार्वजनिक ठिकाणी नेहमीच दिसतात. हातात छोट्या पुस्तकांचा गठ्ठा आणि खांद्याला ऑफिस बॅग लटकवलेला एक विक्रेता आत शिरला आणि या विक्रेत्यांच्या ठराविक(नाकातून काढल्यासारख्या वाटणारया) आवाजामधे त्याने बोलायला सुरुवात केली. 'तुम्हाला पडणारया सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामधे मिळतील', असे म्हणत त्याने हातातले पुस्तक उंचावून दाखवले. 'गाईचे दूध पवित्र का? एका सरळ रेषेत तीन दारे का नसावीत? शनिचे दर्शन समोरूनच का घ्यावे? घराचा मुख्य दरवाजा शोभनीय का असावा?' असे अनेक प्रश्न त्याने उच्चारले. मनात आले की हे प्रश्न जरी साधारण वाटत असले तरी या प्रश्नांची उत्तरे कोण लिहीत असेल? आणि कशाच्या आधारावर? काय प्रमाण मानून? कुठे सापडतात यांना ही उत्तरे?या प्रश्नांची उत्तरे लिहीणारे हे विचारवंत तरी कोण? आणि वाचकांनी ही उत्तरे ग्राह्य धरावीत असे यांना ठामपणे का वाटते? आणि अशा प्रकारची पुस्तकविक्री करुन नफा कमवण्याचा विचार हे लोक का करु शकले? खरचं.... का?
लोक धर्माचे पालन करतात. पण धर्माचे पालन करता करता सहज अंधश्रद्ध होऊन जातात का आणि मग (अंध)श्रद्धाळू भाविकांच्या मनाचा ताबा घेऊन, त्याचेच भांडवल करुन पैसा कमावणारेही असतातच की!

आणखी एक अशाच प्रकारच पुस्तक मी पाहिल होत. त्यावर लिहील होत 'तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील' एका देवतेच चित्र त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते. तर त्याच लॉजिक अस होत की, तुमच्या आयुष्यातली एखादी समस्या/किंवा भेडसावणारा एखादा प्रश्न मनात धरायचा. मग त्या पुस्तकाचे शेवटचं पान उघडायच.(शेवटच्या पानावर चौकटींच्या रकान्यांमधे आकडे लिहिलेले होते) आणि कोणत्याही एका आकड्यावर बोट ठेवायच. ज्या आकड्यावर बोट असेल तो आकडा पुस्तकामधे शोधायचा आणि त्या आकड्यासमोर जे लिहिलेले असेल ते त्या समस्येचे उत्तर किंवा ती समस्या निवारण्याचा उपाय असणार.
??????????????????????????

थोड गोंधळल्यासारख झालय मला. म्हणजे श्रद्धा-अंधश्रद्धा या बाबी एका बाजूलाच राहील्या, पण मग हे काय चाललय? आणि ते चालवून घेतल जातय म्हणून चाललय.... मला नुकतच वाचलेल्या शोधयात्रा या पुस्तकातील 'हा' उतारा आठवला.
हम्म्.. या गोष्टीवर विचार करावा तेवढ थोडच आहे.. आय नीड अ ब्रेक नाउ...

No comments: