Tuesday, June 30, 2009

सर्दी... कुछ लेते क्यू नही?

दोन-तीन दिवसांपासून अगदी हैराण केलय या सर्दीने! एकदा सर्दी झाली की कमीतकमी चार दिवसांची पाहुणी असतेच. मग लवकर बरे होण्यासाठी कितीही औषध-पाणी करा, हिचा चार दिवसांचा मुक्काम ठरेलेलाच! आणि एकटी येत नाही हो.. डोकेदुखी, अंगदुखी-कणकण बरोबर बरोबर घेऊनच येते.

आक् छी.. excuse me... आ..आ..आक् छी.. exxxcuse me... आक् छी.. आक् छी.. आक् छी.. (मी नाही म्हणणार excuse me... जा.. :P)
माणूस कितीही धडधाकट,हट्टा-कट्टा असला तरी सर्दी झाल्यावर किती केविलवाणा दिसतो. नाही?

पूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात यायची, एक सर्दीने बेजार झालेला माणूस - त्याची ती केविलवाणी अवस्था बघून त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला विचारत असतात, 'कुछ लेते क्यू नही?' हम्म्म्.. आता असं कुछ लेके सर्दी पटकन जात असती तर काय..!

काहीतरी लिहाव असं वाटल उगाचचं, पण सर्दीने डोक इतक बधिर आणि सर्दीमय झालय की काही(चांगल)सुचतच नाहीये. मग सर्दीवरच चार ओळी लिहिल्या..

'हाय हाय हाय ये सर्दी,

है मौसम भी बेदर्दी,

तेरे नाक मे दम कर देनेसे,

मेरा सिर भी फुटा जाये...'

'हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी' या हिंदी गाण्याच्या चालीवर या ओळी छान बसतील! मूळ गाण्यातल्या 'मजबूरी'ची जाग 'सर्दी'ने घेतलीये. त्यामुळे कमी पडलेले दोन शब्द भरून काढण्यासाठी पहिल्या ओळीमधे आणखी एक 'हाय' टाकली. पण ही तिसरी 'हाय़' या सर्दीसाठीच आहे बरे! ...अरे देवा... मी हे मघापासून काय बरळतीये... सर्दीमुळे डोकं अजिबातच चालेनासं झालय. खरच आता 'कुछ तो लेके मै सो जाती'...

काही का असेना पण या सर्दीमुळे एक दिवसतरी खरीखुरी हक्काची 'Sick Leave' घेता येते. ;) :)

Wednesday, June 24, 2009

पाऊस....


पाऊस, मनातल्या आठवणींना भिजवून जातो. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा एक एक आठवणी बाहेर यायला लागतात. अगदी बालपणापासूनच्या..... डबक्यातल्या होड्या.. गारा वेचणं - तुझ्यापेक्षा माझ्याकडेच जास्त असं म्हणत पावसातच नाचणं, डबक्यात उड्या मारण, भिजण - भिजवण...... पाऊस सुरु व्हायचा तोच शाळा सुरु झाल्याची वर्दी देत! नवी पाठ्यपुस्तकं, नव्या वह्या.... त्या कोरया-करकरीत पानांचा वास अजूनही आठवतोय. नवा वर्ग, नवे वर्गमित्र, नवे शिक्षक.... मग बरयाचदा सुरुवात व्हायची ती - 'माझा आवडता ऋतू - पावसाळा'ने :)

वाढत्या वयाबरोबर पावसात भिजण्याचे वेडपण वाढलेले.... एकदा तर अचानक आलेल्या पावसाने क्लासपर्यंत पोचेतो चिंब भिजवून टाकलेले आणि आम्हा ३-४ जणींना असे क्लासच्या दारात पाहून सरांनी क्लासलाच सुट्टी दिलेली... आणि मग पुन्हा सायकलवरुन भिजत भिजतच घर गाठलेलं.....बालपणापासून, शाळा, कॉलेज आता ऑफीस, वयाची एकेक अंतरं पार केलेली, पण पावसाबरोबरचे असलेले हितगूज मात्र तेच.... मातीचा सुगंध (या सुगंधामुळेच लहानपणी मला पावसाळ्यात माती खायची खूप आवड होती :)).... पानाफुलांतून डोकावणारा ताजेपणा....कधी पावसात चिंब भिजण..... कधी झाडांना-पाना-फुलांना बिलगलेला पाऊस बघत रहाण...... तर कधी शांतपणे बाहेरचा पाऊस नुसताच ऐकत रहाण...... पावसावरच्या कविता, गाणी यांनी लावलेलं वेड...... वाढत्या वयाबरोबर पावसाबरोबरचे हे मैत्र अधिकच घट्ट होत गेलेले....

सांगण्यासारख खूप आहे, पण किती आठवणी सांगाव्यात? आता पूर्णविराम देतेच.. पण फक्त या लेखापुरताच कारण मनात भरुन आलेलं आठवणींचं आभाळ मात्र बरसल्याशिवाय निरभ्र व्हायच नाही.. :)

Thursday, June 18, 2009

एक(खरं तर अनेक) प्रश्नचिन्ह

गेल्या आठवड्यात एस्.टी. ने गावी निघाले होते. स्थानकावर तशी गर्दी ही नेहमी असतेच. एस्.टी. सुद्धा एकदम 'फुल्ल' होती. सगळे प्रवासी स्थिरस्थावर होत होते. इतक्यात फेरीवाल्या विक्रेत्यांच्या फेरया सुरु झाल्या. काही ठराविक वस्तूंचे विक्रेते तर अशा सार्वजनिक ठिकाणी नेहमीच दिसतात. हातात छोट्या पुस्तकांचा गठ्ठा आणि खांद्याला ऑफिस बॅग लटकवलेला एक विक्रेता आत शिरला आणि या विक्रेत्यांच्या ठराविक(नाकातून काढल्यासारख्या वाटणारया) आवाजामधे त्याने बोलायला सुरुवात केली. 'तुम्हाला पडणारया सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामधे मिळतील', असे म्हणत त्याने हातातले पुस्तक उंचावून दाखवले. 'गाईचे दूध पवित्र का? एका सरळ रेषेत तीन दारे का नसावीत? शनिचे दर्शन समोरूनच का घ्यावे? घराचा मुख्य दरवाजा शोभनीय का असावा?' असे अनेक प्रश्न त्याने उच्चारले. मनात आले की हे प्रश्न जरी साधारण वाटत असले तरी या प्रश्नांची उत्तरे कोण लिहीत असेल? आणि कशाच्या आधारावर? काय प्रमाण मानून? कुठे सापडतात यांना ही उत्तरे?या प्रश्नांची उत्तरे लिहीणारे हे विचारवंत तरी कोण? आणि वाचकांनी ही उत्तरे ग्राह्य धरावीत असे यांना ठामपणे का वाटते? आणि अशा प्रकारची पुस्तकविक्री करुन नफा कमवण्याचा विचार हे लोक का करु शकले? खरचं.... का?
लोक धर्माचे पालन करतात. पण धर्माचे पालन करता करता सहज अंधश्रद्ध होऊन जातात का आणि मग (अंध)श्रद्धाळू भाविकांच्या मनाचा ताबा घेऊन, त्याचेच भांडवल करुन पैसा कमावणारेही असतातच की!

आणखी एक अशाच प्रकारच पुस्तक मी पाहिल होत. त्यावर लिहील होत 'तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील' एका देवतेच चित्र त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते. तर त्याच लॉजिक अस होत की, तुमच्या आयुष्यातली एखादी समस्या/किंवा भेडसावणारा एखादा प्रश्न मनात धरायचा. मग त्या पुस्तकाचे शेवटचं पान उघडायच.(शेवटच्या पानावर चौकटींच्या रकान्यांमधे आकडे लिहिलेले होते) आणि कोणत्याही एका आकड्यावर बोट ठेवायच. ज्या आकड्यावर बोट असेल तो आकडा पुस्तकामधे शोधायचा आणि त्या आकड्यासमोर जे लिहिलेले असेल ते त्या समस्येचे उत्तर किंवा ती समस्या निवारण्याचा उपाय असणार.
??????????????????????????

थोड गोंधळल्यासारख झालय मला. म्हणजे श्रद्धा-अंधश्रद्धा या बाबी एका बाजूलाच राहील्या, पण मग हे काय चाललय? आणि ते चालवून घेतल जातय म्हणून चाललय.... मला नुकतच वाचलेल्या शोधयात्रा या पुस्तकातील 'हा' उतारा आठवला.
हम्म्.. या गोष्टीवर विचार करावा तेवढ थोडच आहे.. आय नीड अ ब्रेक नाउ...

Monday, June 15, 2009

काही निवांत क्षण...





हा आठवडांत ((आठवडा + अंत) = (weekend)) अगदी छान गेला. महाबळेश्वरची थंड हवा, धुक्याने वेढलेले डोंगर, दरया... तिथली भटकंती..संध्याकाळी मस्तपैकी स्ट्रॉबेरी आइस्क्रीम खात, पाय थकेपर्यंत अगदी मनसोक्तपणे मार्केटमधे फिरत रहाण.... मग थंड मोकळ्या हवेत बसून गरमा गरम जेवण,गप्पा...तिथली वेगवेगळी ठिक़ाणं बघताना, फोटोग्राफीचे निरनिराळे प्रयत्न करून पहाणं.. मजा आली.