Sunday, February 22, 2009

किती बडबड सुरू आहे....

बोलणं, बोलत रहाणं हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. मनातले विचार, भावना व्यक्त करण्यासाठी त्या 'बोलून दाखवता येणं' ही माणसाला मिळालेली एक देणगीच आहे. या देणगीचा प्रत्येकजण आपापल्यापरिने वापर करत असतो. काही व्यक्ती मितभाषी असतात तर काहींना सतत बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृति! एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बडबडा असेल तर तिला गप्पा मारण्यासाठी कोणाची ओळख लागतेच असे नाही. एखाद्या नवख्या ठिकाणीसुद्धा, लोकांशी ओळख काढून बोलण सुरू होतं आणि मग गप्पांचा ओघ सुरूच रहातो. अशावेळी यांना बोलायला एकामागोमाग एक विषय सुचतात तरी कसे, याच मला खरच आश्चर्य वाटत.(मला स्वतःला असे विषय सुचत नाहीत ना म्हणून मला आश्चर्य वाटत!)
बरयाचदा बोलण ही माणसाच्या स्वभावाची गरज होऊन जाते. म्हणजे जेव्हा मनावर एखाद्या गोष्टीचा ताण असतो किंवा मनात एखादे द्वंद्व सुरू असते, अशावेळी आपलं मन स्वतःशीच संवाद साधत रहातं. पण जेव्हा आपण हा ताण, हे द्वंद्व कोणाजवळतरी बोलून दाखवतो, तेव्हा खरचं खूप हलक वाटतं. भलेही त्यावेळी त्य परिस्थितीतून मार्ग मिळतोच असं नाही पण नक्कीच मनावरचा भार अंशतः तरी कमी होतो.
कधीकधी आपण अनुभवलेली एखादी गोष्ट किंवा एखाद्या विषयाबद्दलचं आपल ज्ञान, आपली मतं यांची चर्चा करावी अस वाटत किंवा आपली विचारसरणी कुठेतरी पडताळून पहावी अस वाटत. अशावेळी ऐकून घेणारी कोणी व्यक्ती असेल तेव्हा तिच्यासमोर आपण भडभडून बोलतच रहातो. अगदी समोरच्या व्यक्तीलाही आपल्या बोलण्यातला उत्साह जाणवेल इतके आपण भारावल्यासारखे (fully charged होऊन) बोलतच रहातो. :)
खरच 'बोलण' हे माणसाला अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी मिळालेलं एक साधन आहे. त्याचा योग्य वापर करण हीदेखील एक कलाच आहे!

No comments: