Monday, August 10, 2009

प्रातःचलन

अर्थातच 'Morning Walk'!! (असे प्रचलित आणि ओळखीचे शब्द वापरले की लवकर उलगडा होतो विषयाचा. असो.) तर मी रोज सकाळी लवकर उठून मस्त-मोकळ्या हवेत फिरायला जाते असा (गोड)गैरसमज कोणीही करुन घेऊ नये बरे! हां पण कधीतरी 'आपण दिवसेंदिवस जरा जास्तच आळशी होत चाललोय' असा विचार जास्तच तीव्रतेने मनाला टोचणी द्यायला लागला की 'ते काही नाही उद्या(तरी) नक्की सकाळी लवकर उठून फिरुन यायच मस्तपैकी' अस स्वतःला बजावून मी झोपी जाते. आणि मग सकाळी लवकर उठून ठरविल्याप्रमाणे सुरु होते अस्मादिकांचे प्रातःचलन!!
कधी आपल्याच 'इलाक्या'मधल्या पण पूर्वी कधी न गेलेल्या वाटेला लागयच तर कधी तळजाईची टेकडी गाठायची.
एकदा असचं फिरायला म्हणून बाहेर पडले. सकाळचे फिरणे म्हणजे भरभर चालणे अशी माझी व्याख्या. त्यानुसार मी वेगानेच चालत होते. इतक्यात शेजारुन एक मुलगा विरुद्ध दिशेने चालत गेला आणि जाता जाता एक टिप्पणी टाकून गेला. मोठ्याने गाण म्हणाला तो. कोणत माहितीये? 'हिची चाल तुरुतुरु..' मी माझ्याच विचारात चालत होते. पण गाण्याची ती ओळ टाकून ज्या चपळाईने तो तिथून पटकन निघून गेला तेव्हा मला जाणवल की हे आपल्यासाठीच होतं. आणि जेव्हा मला हे जाणवल तेव्हा मी दोन सेकंद आहे त्याच जागी स्तब्ध उभी राहिले. म्हणजे यावर काही प्रतिक्रीया द्यावी का आणि काय द्यावी असा विचार मनात येऊन गेला पण लगेच पुढच्या क्षणी मलाच हसू आले. म्हणजे मी काय तिथेच फसकन हसले नाही..(काय राव तेवढं कळतकी मला!!) पण योग्य वेळी सुचलेल्या त्या योग्य टिप्पणीबद्दल मला मनापासून हसू येत राहिले. नंतर मी मैत्रिणींना हा प्रसंग सांगितला तेव्हा त्यांनीसुद्धा हसून त्या मुलाच्या 'प्रसंगावधाना'(presence of mind) चेच कौतुक केले(?)
एकदा असच 'अपने इलाके'मे फिरत होते. हिवाळ्यातले थंडीचे दिवस असल्याने अजून पुरत उजाडलं नव्हत. पण सकाळी फिरायला येणारया लोकांची पुष्कळ वर्दळ होती रस्त्यावर. माझ्यासमोरुन एक जोडप चालत येत होत. पण काहीतरी विसंगती वाटत होत. बायको अगदी सैनिकी थाटात लेफ्ट-राईट करत चालत होती. म्हणजे डावा पाय पुढे येई तेव्हा उजवा हातही पुढ़े अगदी डोक्याच्या वरपर्यंत. आणि नजर अगदी समोर. आणि नवरामात्र अगदी अंग चोरुन, अवघडून गेल्यासारखा चालला होता. आपल्या बायकोच हे असं चालण फारच विचित्र वाटून लोक आपल्याकडेच बघत नाहीयेत ना या विचाराने अस्वस्थ झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. मी म्हटल अहो काका कशाला एवढा विचार करताय.. सकाळच्यावेळी तरी मनसोक्तपणे फिरा सगळे ताण-तणाव ठेवा बाजूला! म्हणू दे कोणाला काय म्हणायचय ते! (हो पण मी मात्र हे मनातल्या मनात म्हटल. एक तर काका ओळखीचे नव्हते आणि त्यात काकूंचा पवित्रा आक्रमक होता. :P )
एकदा तळजाईची टेकडी उतरुन खाली येत होते तेव्हा माझ्यासमोर ४-५ जणींचे महिलामंडळ चालले होते. त्या सर्वजणी त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या. (विरुद्ध गट म्हणजे 'जानी दुश्मन' वगैरे नाही बर का. तर सध्या अनुपस्थित असलेल्या व्यक्तींचा गट.) आता मला हे कसे कळाले की त्या त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या? उत्तर सोपे आहे, त्यांच्या बोलण्यावरुनच समजले मला. ;) इतक्यात समोरुन आणखी ४ जणींचे महिलामंडळ आले. 'अय्या तुम्ही आत्ता खाली उतरताय म्हणजे खूपच लवकर आला असाल नाही का? आम्हाला सांगायच ना आम्हीपण आलो असतो.' समोरच्या गटातील एकजण म्हणाली. 'आम्ही रोजच एवढ्या लवकर येतो' अगदी ठसक्यात उत्तर दिल एकीने. मग दोन्ही गट आपापल्या दिशेने निघून गेले. पण पुन्हा गप्पांमधे विरोधी गटाचीच चर्चा. त्यावरुन समजले की आत्ता गेलेलाच त्यांचा विरोधी गट होता तर. सकाळी सकाळी तरी असल्या चर्चा टाळाव्यात नाही का. (पुन्हा मी हे मनातल्या मनातच म्हटले. हो उगीच धोका कशाला पत्करायचा.)
कधी एखादा आजोबांचा गट फिरत असेल तर त्यांच्या गप्पांमधून जगातल्या सगळ्या ठळक बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळे दोन-तीन दिवस पेपर वाचला नसेल तर त्या सगळ्या बातम्यांचा ऊहापोह तुम्हाला ऐकायला मिळेल. जस्ट फोलो देम फॉर समटाईम. :)
तळजाईच्या देवीच्या मंदिरामधला 'हास्यगट' मात्र माझ्यासाठी एक आकर्षणाचा भाग आहे. तिथे जमणारी बरीच मंडळी माझ्या आजोबांच्या वयाची आहेत. आधी थोडा प्राणायाम आणि मग मोठमोठ्यान हसण्याचा व्यायाम असा यांचा क्रम! मी मात्र जेव्हाजेव्हा या हसण्याच्या वेळी तिथे पोचते तेव्हा तिथ बसून त्या सर्वांच निरीक्षण करत रहाते. कृत्रिम का असेना पण हे हसू बाहेर पडल्यावर काहीतरी समाधान देऊन जात असावं. सगळ्या जबाबदारया, ताण यांचा निचरा होऊन रहातो आणि हलक होऊन उमललेल निरागस हास्य या आजोबांच्या चेहरयावर दिसत. नंतर त्यांच्या गप्पा कानावर येत रहातात. कोणाच्या मुलाचे/मुलीचे नुकतेच दोनाचे-चार झालेले असतात.. कोणाची मुल अमेरिकेत आहेत, तिथली त्यांची ख्याली-खुशाली.. कोणाच्या मांडीवर नुकतीच नातवंड खेळायला लागेलेली असतात.. कोणाच्या गावाकडच्या शेतीच्या गप्पा किंवा नुकत्याच गावाकडे झालेल्या जत्रेतल्या गमती.. अस बरच काही.एखादी लाही गरम केल्यावर तडतडते आणि नंतर फटकन फुटून अलगद फुलून येते. या मंडळींकडे पाहिल की असचं काहीस जाणवत. प्रत्येक कडू-गोड अनुभवातून अगदी तावून-सुलाखून बाहेर पडून, मग सगळ्या अनुभवांची शिदोरी जवळ ठेवून फुलून आलेल हे आयुष्य. त्यांच बोलण ऐकता ऐकता त्यातून पाझरणार चैतन्य, उत्साह, समाधान जाणवत रहात. मग मलाही फिरायला आल्याच समाधान वाटत. ते चैतन्य आणि उत्साह बरोबर घेऊन मग मीसुद्धा नविन दिवसाच्या तयारीला लागते. :):)

5 comments:

Yawning Dog said...

Chhan post ahe, Prath:chalan bhareech :)

Ajay Sonawane said...

लेख नेहमीप्रमाणे छान ! मी ही मध्यंतरी तळ्जाई ला भल्या पहाटे चालत जायचो (भूतकाळ :) ), त्यावेळेस अशाच एका आजोबांच्या चाललेल्या गप्पा कानावर पडल्या आणि डोळ्यांत पाणी आलं, तुझा लेख वाचून त्याची आता आठवण झाली.

Mugdha said...

masta post!!

-mugdha
www.mugdhajoshi.wordpress.com

Aparna said...

YD, Ajay, Mugdha - dhanyawad :)

prasad said...

Hi Aparna...
Thanks for putting comment on my dead blog :)
You also write superb..i am also hoping to write something..lets see