Wednesday, June 24, 2009

पाऊस....


पाऊस, मनातल्या आठवणींना भिजवून जातो. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा एक एक आठवणी बाहेर यायला लागतात. अगदी बालपणापासूनच्या..... डबक्यातल्या होड्या.. गारा वेचणं - तुझ्यापेक्षा माझ्याकडेच जास्त असं म्हणत पावसातच नाचणं, डबक्यात उड्या मारण, भिजण - भिजवण...... पाऊस सुरु व्हायचा तोच शाळा सुरु झाल्याची वर्दी देत! नवी पाठ्यपुस्तकं, नव्या वह्या.... त्या कोरया-करकरीत पानांचा वास अजूनही आठवतोय. नवा वर्ग, नवे वर्गमित्र, नवे शिक्षक.... मग बरयाचदा सुरुवात व्हायची ती - 'माझा आवडता ऋतू - पावसाळा'ने :)

वाढत्या वयाबरोबर पावसात भिजण्याचे वेडपण वाढलेले.... एकदा तर अचानक आलेल्या पावसाने क्लासपर्यंत पोचेतो चिंब भिजवून टाकलेले आणि आम्हा ३-४ जणींना असे क्लासच्या दारात पाहून सरांनी क्लासलाच सुट्टी दिलेली... आणि मग पुन्हा सायकलवरुन भिजत भिजतच घर गाठलेलं.....बालपणापासून, शाळा, कॉलेज आता ऑफीस, वयाची एकेक अंतरं पार केलेली, पण पावसाबरोबरचे असलेले हितगूज मात्र तेच.... मातीचा सुगंध (या सुगंधामुळेच लहानपणी मला पावसाळ्यात माती खायची खूप आवड होती :)).... पानाफुलांतून डोकावणारा ताजेपणा....कधी पावसात चिंब भिजण..... कधी झाडांना-पाना-फुलांना बिलगलेला पाऊस बघत रहाण...... तर कधी शांतपणे बाहेरचा पाऊस नुसताच ऐकत रहाण...... पावसावरच्या कविता, गाणी यांनी लावलेलं वेड...... वाढत्या वयाबरोबर पावसाबरोबरचे हे मैत्र अधिकच घट्ट होत गेलेले....

सांगण्यासारख खूप आहे, पण किती आठवणी सांगाव्यात? आता पूर्णविराम देतेच.. पण फक्त या लेखापुरताच कारण मनात भरुन आलेलं आठवणींचं आभाळ मात्र बरसल्याशिवाय निरभ्र व्हायच नाही.. :)

4 comments:

Yawning Dog said...

>>वाढत्या वयाबरोबर पावसाबरोबरचे हे मैत्र अधिकच घट्ट होत गेलेले....

gammat ahe, maze ulate zale, vadhtya vayabarobar pavsabarobarchee maitree kamee zalee :D

Aparna said...

ohh.. pan mag he maitri japnyacha prayatna tari jarur kar :)

मीनल said...

Good aparna..nice one,
अगदी ३-४ पावले उरलेली असतानाही क्षणात येणाऱ्या सरीने भिजवून टाकलेले मलाही आठवते.
आणि अगदी नियम असल्याप्रमाणे पाऊस सुरु झाला की, आई चहा भज्या समोर ठेवते.या पावसात गुंतलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत...:)

SACHIN PATHADE said...

hey.. mast aahe! :) guess, mi pan nemka blog sathee hach subject nivdala hota aani lihayala ghetal bt complete naahi kel :). Lazy ness, bt tuza blog wachun mast watal. Keep doing godo work :)