Wednesday, February 18, 2009

म्युझिक मस्ती आणि (गणपती) डान्स!!!


डान्स करायला कोणाला आवडत नाही??

मला वाटत की प्रत्येकाला डान्स करायला आवडत पण जसजसं वय वाढेल तसतसं आपल्या आत असलेला 'डान्सर' लोप पावत जातो. प्रत्येकाला अगदी 'हृतिक' सारखा छान डान्स जमेलच अस नाही. तसा अट्टहासही नाही. पण संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला प्रत्येकाला येत. आपल्या आत असलेली डान्स करण्याची ऊर्मी बाहेर पडायला तेवढ पुरेसं आहे. :) मलाही नाचायला खूप आवडत. लहान असताना शाळेत गॅदरिंगमध्ये नाच, नाटक यात भाग घ्यायचे. पण कॉलेजला गेल्यावर नाचायची सन्धीच मिळाली नाही. :(

डान्सचे सगळेच प्रकार छान असतात. पण मला विशेष आकर्षण वाटत ते 'गणपती डान्स'चे! आता 'गणपती डान्स' म्हणजे काय हे सान्गायची गरज आहे अस मला तरी वाटत नाही. पण तरीही ज्याना माहिती नाही त्यांच्यासाठी - 'कोणीही आपल्याकडे बघत नाही अशी मनाची समजूत घालून, कानावर पडणारया संगीताच्या बोलावर/तालावर मनसोक्तपणे हात-पाय हलवत नाचणे' म्हणजे 'गणपती डान्स'!!गणेशोत्सव मला आवडतो याच मुख्य कारण म्हणजे माझा लाडका देव 'गणपती' आणि दुसर कारण म्हणजे 'गणपती डान्स'. गणेशोत्सवाचा पहिला आणि शेवटचा दिवस म्हणजे सगळ्या डान्सर्रसना पर्वणीच असते. मिरवणुकीत नाचणारे अगदी बेभान होऊन नाचत असतात. तो नाच बघण म्हणजे निव्वळ मनोरंजन असते. अर्थातच, मी काही मिरवणुकीत जाऊन नाचत नाही.(याबद्दल मला नेहमीच वाईट वाटत, की मी मुलगा का नाही झाले :( ) साधारण ८ ते १०वी मधे असताना, मिरवणूक बघायला लागले की नाचणारयांचा जोश पाहून मलाही संचारल्यासारख व्हायच. मग बाहेर चाललेल्या मिरवणुकीच्या तालावर माझा घरामधे 'गणपती डान्स' सुरु व्हायचा. आणि माझा डान्स बघण्यासाठी एकमेव प्रेक्षक म्हणजे माझी आई! ती आपली माझा डान्स बघून हसत बसायची. मिरवणूकीत जी गाणी लावतात त्यांच म्युझिकच अस असत की ते तुम्हाला ताल धरायला लावत. काही गाणीही अशी असतात की ती कानावर पडली की अंगात नाचाच वार संचारतच बघा! अशी गाणी तयार करणारया संगीतकारांच आणि गीतकारांच कौतुक नक्की कराव लागेल. काही गाणी like 'कोंबडी पळाली..', सन्दीपच 'ढिपाडी ढिपांग..', 'धूम मचाले..', 'अब के सावन ऐसे बरसे..'(शुभा मुदगल्)(या गाण्याच्यावेळी पाऊस पडत असला तर मग काय आणखीनच मजा!), 'चमचम करता' ,'मौजाहि मौजा', 'हम्मा हम्मा','के सेरा सेरा', 'देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार..' अशी कितीतरी गाणी सान्गता येतील.

तर या नाच करण्याच्या मोहापायी एकदा एक गम्मतशीर किस्सा घडला. एकदा संध्याकाळी ८.३०-९ च्या सुमारास सगळीकडे लाइटस गेले होते. इतक्यात कुठूनतरी जोरजोरात लाउडस्पीकरवर गाण्याचे आवाज ऐकू यायला लागले. काय आहे ते बघण्यासाठी मी आणि माझी बहीण टेरेसवर गेलो. शेजारच्या गल्लीमधे कोणाच्यातरी घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. तिथे generator सुरु असल्याने गाणी सुरु होती. बाकी कुठेच लाइटस नव्हते. टेरेसवरही अन्धार होता. मग काय तिथेच 'गणपती डान्स' सुरु केला. :) अगदी हवे तसे हात-पाय हलवत, धुन्द होऊन आमचा नाच सुरु होता. साधारण १०-१५ मिनिटे आम्ही नाचत होतो. इतक्यात शेजारच्या टेरेसवर हालचाल दिसली. मी थोडे थांबून, डोळे बारीक करुन पाहिल तर काय??? तिथे काही लोक बसले होते आणि ते आमच्याकडेच बघत होते!!! अन्धारात आम्हाला काही दिसलच नव्हत. माझी बहीणपण तोपर्यंत भानावर आली होती. आम्ही काहीही न बोलता तिथून धूम ठोकली. खाली आल्यावर आम्हाला काय कराव/बोलाव ते सुचतच नव्हत. तो शॉक पचायला थोडा वेळ गेला. नंतर मात्र आम्ही दोघी पोट धरून हसत होतो. :) आमचा नाच बघणायरयांचही 'free entertainment' झाल होत :). तर अस हे नाचाच वेड!!

पण हल्ली नाच खूप मागे पडलाय. नाचाची आवड प्रत्येकाला असली तरी मिरवणूकीत जाऊन नाचणे प्रत्येकालाच शक्य नसते. बरयाचदा तिथे manners/status असे अवघड शब्द आडवे येतात. मग ही नाचाची आवड, ही ऊर्मी पूर्ण कशी करायची? म्हणूनच का हल्ली disc,pub ची संस्कृती वाढू पहातीये?मोकळेपणाने नाच करण वेगळ असत. नक्कीच तुम्हाला relaxed वाटेल. पुन्हा charge झाल्यासारखे वाटेल. पण नाचाच्या नावाखाली चालणारे विक्षिप्त प्रकार मात्र अजिबात समर्थनीय नाहीयेत. 'मनमोकळेपणाने नाचणे' आणि 'नैतिकता सोडून नाचणे' यात नक्कीच फरक आहे. कारण status/manners च्या नावाखाली जर मिरवणूकीत नाचण टाळलं जात तर नीतिमत्ता सोडून पबमध्ये नाचण कितपत योग्य आहे? अर्थातच मिरवणूकीत दारू पिऊन झिंगणारयांचही मी समर्थन करणार नाही.

शरीर आणि मन ताजतवान करण्यासाठी नाचा. बाकीचे चोचले पुरवण्यासाठी नको. प्रत्येकाने स्वतःमधला 'डान्सर' जिवंत ठेवला पाहिजे. संगीताच्या तालावर ठेका धरुन हालणारे हात-पाय रोखू नका. चार-चौघात लाज वाटते? मग एकट असताना नाचून बघा. पण ही ऊर्जा ओघवती ठेवण्याचा प्रयत्न जरूर करा!

Keep dancing...

Cheers. :):):)1 comment:

Jayu said...

manatale bolalis