Wednesday, March 18, 2009

बाथरूम सिंगर्स....

सगळ्यांना थोडीच गोड, गाता गळा मिळतो? पण म्हणून काय त्यांनी गायचं नाही अस थोडीच असत! मग अशा माझ्यासारख्यांसाठी हे एक हक्काच व्यासपीठ आहे. ;)
एखाद गाण ऐकल, आवडल की ते गुणगुणावसं वाटत, कधी मोठ्याने म्हणून बघावसं वाटत. मग घरात गायला लागलं की असतातच आमचे छोटे बंधुराज, चित्र-विचित्र हावभाव करत, मी किती छान(?) गातीये याची पोचपावती द्यायला. :) एखादं नवं वा जुनं गाण प्रत्येकालाच आवडतं. आवडण्याची कारण वेगवेगळी असू शकतात. कधी गाण्याचे बोल आवडतात, कधी पार्श्वसंगीत आवडत तर कधी गाण्याची 'हटके स्टाईल' आवडते. मग ते गाण आपण नकळत गुणगुणायला लागतो. पण गुणगुणण्याची वारंवारता आणि आवाज वाढला की आजुबाजूच्या लोकांची बोटं कानात जायला लागतात :( मग गाणारा आवाज कमी व्हायला लागतो. गाण्यासाठी बाहेर पडू बघणारा हा दबलेला आवाज, बाथरूममध्य़े शिरल की गळ्यातून बंड करून बाहेर पडतो. तशी मीहि एक बाथरुम सिंगरच.. बाथरुमची ती १0 x ४ ची जागा म्हणजे गाण्यासाठी मिळालेलं हक्काच व्यासपीठ आहे माझ्यासाठी! पण आतून गाण्याचा आवाज यायला लागला की बाहेरुन जोरजोरात दार वाजायला लागत, 'लवकर आवरा, ऑफीसला जायला उशीर होतोय, गाणी नंतर म्हणा'- इति मातोश्री. पण काय करणार हाडाच्या बाथरुम सिंगरला गाण म्हटल्याशिवाय स्वस्थ कस बसवेल! :)
आम्ही नवीन फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हाची गोष्ट. इथे सगळेच लोक नवे होते. नुकतीच ओळख व्हायला लागली होती. इथे प्रत्येक मजल्यावर ४ फ्लॅटस. मधे एक मोठा पॅसेज आणि त्याच्याकडेने एका बाजूचे सगळे फ्लॅटस एकाखाली एक. सुरुवातीला गाण्यासाठी बाहेर पडणारा आवाज मी प्रयत्नपूर्वक शांत ठेवला. कारण मधे रिकामा पॅसेज असल्यामुळे, गायला सुरुवात केली की तो आवाज आमच्या फ्लॅटच्या बाजूला असलेल्या, वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या फ्लॅटसमधे पसरणार होता. आणि न जाणो माझा आवाज सहन न होऊन कोणीतरी तक्रार करायला घरी आल तर..! पण अस किती दिवस चालणार होत? शेवटी एकदा हा आवाज फुटलाच! मनसोक्तपणे मोठ्याने गाणी म्हणून घेतली. नंतर ऑफीसला निघायच होत त्यामुळे आवरण्याची गडबड सुरु होती. इतक्यात माझा भ्रमणध्वनी वाजला. त्याच्या आतल्या कप्प्यामधे(इनबॉक्स)संदेश आला होता. आलेला संदेश वाचता वाचता मला हसू यायला लागल.संदेश होता - 'गुड सॉंन्ग. वन्स मोरं' खालच्या मजल्यावरच्या काकूंनी माझ्या गाण्याला दिलेली दाद होती. :) ते वाचून मलाही मजाच वाटली. बाथरुम सिंगर्सनासुद्धा गाण्याची पोचपावती मिळते तर! आता तर माझ हे गाण्याच वेडं सगळ्यांनाच माहीत झालय. बरेच दिवस गाण ऐकू आल नाही की काकू विचारतात, 'काय अपर्णा कुठे आहेस? तुझ गाण ऐकल नाही बरेच दिवस.' ;) इतकच नाही तर आमच्या इमारतीमधे बाथरुम सिंगर्सची संख्यापण वाढलीये. :) आपणही गाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि असं गाताना किती आनंद मिळतो हे सगळ्यांनाच कळायला लागलय.
आत्ता हे लिहीत असताना मी एक मस्त गाणं ऐकतीये.. 'ए मस्सकली मस.. मसकली उड मट्टकली मट्टकली....' मोहित चौहानची गाण्याची अदा आवडली मला :) आणि या गाण्याच्या या ओळी मला जास्तच आवडल्या -
'उडियो न डरियो कर मनमानी मनमानी मनमानी....'
चालू देत गाण्याची मनमानी... :)

4 comments:

Yawning Dog said...

saheech, bathroom singlerla daad denarya kakuna pan daad dili pahije
Mast lihile ahes

Indranil Phadke said...

khupach chan .. ekdam asa free flowing..
ani comment pan bhari milalay... kharach kakuncha comment milana asa aikyala pan chan watata...
kharach kakunna pan daad dyayalach hawi...
ani tu khupach chan lihilay....

Ajay Sonawane said...

वाचतच रहावंसं वाटत असे तुझे लेख असतात, एकदम हलकं-फुलकं पण तरीही कुरकुरीत. हेच बघं ना .."गाण्यासाठी बाहेर पडू बघणारा हा दबलेला आवाज, बाथरूममध्य़े शिरल की गळ्यातून बंड करून बाहेर पडतो" ...किती सुंदर, जे काही तुला म्हणायचं होतं ते अगदी प्रभावीपणे मांडतेस, २-३ आठवड्यापुवी मी जेव्हा पहील्यांदा तु़झा ब्लॉग वाचला तेव्हा मी इतका प्रभावीत झालो की मी लगेचचं माझा मराठी ब्लॉग सुरु केला. त्याबदद्ल तुला धन्यवाद !

Keep posting !

-अजय

Aparna said...

@ YD, इंद्रनील, अजय - धन्यवाद. मनात आल ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला इतकच.