Tuesday, October 12, 2010

बदल

नेहमीच्या दिनचर्येमधला एखादा बदलही बरयाच नवीन गोष्टींना सामोरं घेऊन जातो. मग हा बदल छोटा असो की मोठा.. मात्र नव्या नवलाईच्या नऊ दिवसात उत्साह आणि चैतन्य निर्माण करुन जातो. मग पुन्हा जैसे थे! पुन्हा तोच दिनक्रम, तीच दिनचर्या कंटाळवाणी होऊ लागते आणि मनाला मरगळ येते. ती मरगळ झटकण्यासाठी पुन्हा काहीतरी नव्याचा शोध... असं हे चक्र सुरुच रहात.. या चक्रामधे 'बदल'(change) हा महत्त्वाचा घटक आहे बरं!तो उत्प्रेरकाचे काम करतो. रसायनशास्त्रामधे एखादी प्रक्रिया परिणामकारक किंवा जलद होण्यासाठी जसे उत्प्रेरक(stimulator) वापरतात, त्याचप्रकारे हे छोटे-मोठे बदल आयुष्यात येणारा तोचतोचपणा/कंटाळा कमी करण्यासाठी उत्प्रेरकाचे काम करतात.
इतक्यातच मी नवीन ठिकाणी नोकरीवर रुजू झाले. नवीन जागा, नवे लोक, बसमधे चढण्याचे ठिकाण, बसमधले लोक, नवा रस्ता, नवी वळणे... सगळच नवंनवं..सध्यातरी सगळ छानछानच दिसतय.. वाटतय.. हळूहळू इथल्या जागेशी, लोकांशी परिचय वाढेल.. आणि मीसुद्धा त्यांच्यातलीच एक होऊन जाईन. इथल्या क्रिया-प्रक्रिया(processes) अंगवळणी पडून जातील. कामाचे नियोजन कसे करायचे, कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा, कोणती समस्या आल्यावर कोणाला भेटयचं.. कोणाशी बोलायचं, माझ काम कसं परिणामकारकपणे करायचं.. या सगळ्याची मेख येईपर्यंत वेळ बरा जाईल. एक नेटका दिनक्रम(routine) ठरुन जाईल. मग पुन्हा तेच चक्र फिरेल, पुन्हा तोचतोचपणा, कंटाळा.. पुन्हा मन नव्याच्या शोधात..... हे नवं काय असेल.....? नवा प्रकल्प(project)? नव ठिकाण, नवी जबाबदारी? हा बदल वैयक्तिक असेल की व्यावसायिक? माहिती नाही. पण नवं काहीतरी हवं असेल तेव्हाही.... :)