Tuesday, March 3, 2009

एक छोटीसी बात..

कधी कधी काही छोटे-छोटे प्रसंगसुद्धा आपल्याला बरचकाही शिकवून जातात. असाच एक प्रसंग-सकाळी नेहमीप्रमाणे ७.३० वाजता, ऑफीसला जाण्यासाठी घरून निघाले. माझ्या स्टॉपपर्यंत पोचण्यासाठी साधारण १० मिनिटाच अंतर चालत जाव लागत. मी मुख्य रस्त्यापर्यंत आले. आता रस्ता पार करून जायच होतं. इतक्यात मी एका लहान मुलीला पाहील. ती साधारण पहिली किंवा दुसरीला असेल. शाळेचा गणवेश घातला होता आणि पाठीवर दप्तर होते. ती रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात होती. रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती. गाड्या अगदी भरधाव वेगाने येत होत्या आणि ती जीव मुठीत घेऊन उभी होती, पुढच पाऊल कधी टाकू असा विचार करत होती. तिला पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की आई-वडिलांनी एव्हढ्याशा मुलीला एकटीला पाठवलच कसं? एव्हढा निष्काळजीपणा कसा करू शकतात? गाड्या अशा भरधाव येत असतात, या मुलीला अपघात होण्याची शक्यता आहे. असे सगळे विचार भर्रकन मनात येऊन गेले. इतक्यात एक दुचाकीस्वार, गाडीचा वेग कमी करून, माझ्याकडे हात करून म्हणाला, 'तिला(म्हणजे त्या मुलीला) तुमच्याबरोबर घेऊन जा.' मीपण विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. पटकन तिच्याजवळ जाऊन तिचा इवलासा हात पकडला आणि मग आम्ही दोघींनी रस्ता पार केला. मग मी माझ्या स्टॉपजवळ येऊन थांबले आणि ती तिच्या शाळेच्या रस्त्याने निघून गेली. मला मात्र मनात थोडीशी खंत वाटली किंवा एक अपराधीपणा जाणवला, की ती मुलगी अशी रस्त्याच्यामधे उभी असताना मी विचार काय करत बसले? आध पटकन तिचा हात धरून रस्ता पार करायचा ना! की मी खूप चाकोरीबद्ध होऊन गेलीये? बरयाचदा प्रसंगावधान फार महत्त्वाचे असते. एखाद्या क्षणी विचार करण्यापेक्षा पटकन कृती करणं हे त्या क्षणी घडणारया प्रसंगाची उकल करण्यासाठी योग्य असतं.(need of hour/moment) त्या दुचाकीस्वाराची मी आभारी आहे कारण त्याने वेळेत मला भानावर आणलं.नंतर मी ठरवल की अशाप्रकारे जेव्हा एखादा प्रसंग तुमच्याकडून चांगल्या कृतीची अपेक्षा करत असेल तेव्हा विचार करण्यात वेळ दवडून ती संधी वाया घालवायची नाही. अस ठरवल्यावर मला जरा हायसं वाटल.. :) पाहिल तर प्रसंग छोटासाचं, पण खूपकाही शिकवून गेला. अंतर्मुख करून गेला....

No comments: