Tuesday, October 12, 2010

बदल

नेहमीच्या दिनचर्येमधला एखादा बदलही बरयाच नवीन गोष्टींना सामोरं घेऊन जातो. मग हा बदल छोटा असो की मोठा.. मात्र नव्या नवलाईच्या नऊ दिवसात उत्साह आणि चैतन्य निर्माण करुन जातो. मग पुन्हा जैसे थे! पुन्हा तोच दिनक्रम, तीच दिनचर्या कंटाळवाणी होऊ लागते आणि मनाला मरगळ येते. ती मरगळ झटकण्यासाठी पुन्हा काहीतरी नव्याचा शोध... असं हे चक्र सुरुच रहात.. या चक्रामधे 'बदल'(change) हा महत्त्वाचा घटक आहे बरं!तो उत्प्रेरकाचे काम करतो. रसायनशास्त्रामधे एखादी प्रक्रिया परिणामकारक किंवा जलद होण्यासाठी जसे उत्प्रेरक(stimulator) वापरतात, त्याचप्रकारे हे छोटे-मोठे बदल आयुष्यात येणारा तोचतोचपणा/कंटाळा कमी करण्यासाठी उत्प्रेरकाचे काम करतात.
इतक्यातच मी नवीन ठिकाणी नोकरीवर रुजू झाले. नवीन जागा, नवे लोक, बसमधे चढण्याचे ठिकाण, बसमधले लोक, नवा रस्ता, नवी वळणे... सगळच नवंनवं..सध्यातरी सगळ छानछानच दिसतय.. वाटतय.. हळूहळू इथल्या जागेशी, लोकांशी परिचय वाढेल.. आणि मीसुद्धा त्यांच्यातलीच एक होऊन जाईन. इथल्या क्रिया-प्रक्रिया(processes) अंगवळणी पडून जातील. कामाचे नियोजन कसे करायचे, कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा, कोणती समस्या आल्यावर कोणाला भेटयचं.. कोणाशी बोलायचं, माझ काम कसं परिणामकारकपणे करायचं.. या सगळ्याची मेख येईपर्यंत वेळ बरा जाईल. एक नेटका दिनक्रम(routine) ठरुन जाईल. मग पुन्हा तेच चक्र फिरेल, पुन्हा तोचतोचपणा, कंटाळा.. पुन्हा मन नव्याच्या शोधात..... हे नवं काय असेल.....? नवा प्रकल्प(project)? नव ठिकाण, नवी जबाबदारी? हा बदल वैयक्तिक असेल की व्यावसायिक? माहिती नाही. पण नवं काहीतरी हवं असेल तेव्हाही.... :)

Wednesday, May 19, 2010

तिचा हुंकार

आई : या आजकालच्या मुला-मुलींचे काही सांगता येत नाही. कालपरवापासून बघाव तेव्हा हा फोनला चिकटलेला! काय रे काय बोलत तरी काय असता तुम्ही इतकावेळ? कळू दे तरी मला.

तो : अग आई काय सांगू तुला! ती फक्त 'हम्म्...' म्हणून हुंकार भरत असते. कस समजाव काय आहे मनात? मी आपला बोलत रहातो. या मुलींच्या मनात 'नेमक' असत तरी काय...

ती : कसा रे तू असा.. मी आताच कस काही सांगू तुला! इतके दिवस माझ्याच कोशात गुरफटलेले होते.. आता तुझ्याशी नवं नातं जोडल जातय. खूप बोलायच तर आहे तुझ्याशी.. पण अस एकदम स्वतःला मोकळ कस करू....
'हम्म्..' - depends... कधी मला तुझ्या बोलण्याला दुजोरा द्यायचा असतो, कधी तुझा एखादा मुद्दा पटलेला नसतो पण लगेच काही प्रतिसाद द्यायचा नसतो, तर कधी काहीच प्रतिसाद द्यायचा नसतो.. a neutral point of view.
आता या 'हम्म्..' चा कुठला अर्थ कुठल्या वाक्यासाठी घ्यायचा हे समजेल तुला थोड्या सहवासानंतर.. हो ना?

तो : हम्म्म्............. :) ;)

Monday, August 17, 2009

आजा नच ले...

आजा नच ले पाहिला. त्यातला एक प्रसंग - जेव्हा माधुरी गावातल जुन रंगमंदिर(थिएटर) वाचवण्याच्या प्रयत्नामधे असते - नविन नाटकासाठी गावातील लोकांची निवड करण्याचे काम सुरु आहे. एक शेंबडी मुलगी तिथे आलीये आणि ती आपल्या नाचाचे कौशल्य दाखवून माधुरीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतीये. हा नाच बघताना मला तर हसू आवरत नव्हते. आठवला का हे कॅरॅक्टर.. ह्म्म्म तीच ती कोंकणा सेन हो.. अगदी चित्र-विचित्र हावभाव करत केलेला तिचा नाच पहा कधीतरी आवर्जून.. :)
नंतर मला इतर काही सिनेमांमधले असे मजेशीर नाच तसेच काही 'हीरों'ची नाचण्याची इष्टाइल आठवत राहिले. मला आठवलेले काही नाच इथे देत आहे...
- 'सपनेमे मिलती है' (सत्या) मधला मनोज वाजपेय़ीचा नाच
- 'यारो सुनलो जरा' (रंगीला) या गाण्यात आमीरबरोबर त्याच्या मागे फिरणारया 'पक्या'चा नाच.
- 'सपनेमे कुडी वो कौनथी' (संजय दत्त आणि मनिषा कोईराला.) सिनेमाच नाव नाही आठवत. पण संजय दत्तच्या मागेपुढे नाचणारया भाईलोकांचा मजेशीर नाच मात्र आठवतोय.
- 'यारा ओ यारा' या गाण्यातला सनीचा नाच बघा. सायकलच्या टायरमधे पंपाने हवा भरतोय असं वाटत. - अलीकडच्या Delhi 6 मधील 'गेंदाफूल' गाण पाहिलय का? या गाण्यामधे अभिषेक, वहिदा इ. सगळे मिळून नाचत असतात तो प्रसंग छान वाटतो. 'मस्सकली' गाण्यातला सोनमचा नाच पण मजेशीर आहे.
- 'लक्ष' मधे 'अगर मै कहू' या गाण्यात चित्र-विचित्र हावभाव करत ऋतिकने केलेला नाच. तसेच त्याचा 'मै ऐसा क्यू हू' गाण्यातला नाचही लक्षात रहाण्यासारखा :)
- धरमपाजींची नाचण्याची इष्टाइल तर प्रसिद्धच आहे. तसेच जितेंद्रचे उड्या मारत नाचणे. पूर्वीच्या सिनेमांमधेले नाच पहायला छान वाटतात. गाण्याच्या तालावर मान आणि पाय एका ठराविक लयीत हलवून नाचायचे. मजा वाटते हे नाच पहाताना. :)
- 'भोली सुरत दिलके खोटे' मधली भगवानदादा ष्टाईलवरतर आपण जाम फिदा आहोत..
- पूर्वी मराठी सिनेमांमधे एक ठरलेला नेम असायचा. हिंदी गाण्यांचे मराठीमधे भाषांतर करायचे आणि अशा ४-५ गाण्यांचे मिश्रण करुन मराठी गाणे तयार करायचे. हे म्हणजे 'लक्शा' चे सिनेमे. त्यातल एक गाण मला अजूनही आठवत.
मूळ गाण होत 'आप जैसा कोई मेरे जिंदगीमे आये तो बात बन जाये...हो S हो S बात बन जाये..' आणि त्याचा मराठी अनुवाद असा केला होता
'तुमच्यावानी कोनी माझ्या जिंदगीत येईल
तर लै झाक होइल... हो S हो S लै झाक होइल...'
आठवतय का काही... अशी गाणी किंवा असे नाच ? :):)

Thursday, August 13, 2009

सांज ये गोकुळी सावळी सावळी...

सांजवेळ... दिवस कलता झालेला अन निशेच्या आगमनाची चाहूल लागलेली...
मनाला एक अनामिक हुरहुर लावून जाते ही वेळ...
मनात जपलेल्या असंख्य गोष्टींचा गहिवर दाटून येतो. भावना व्यक्त करण ही प्रत्येकाची मानसिक गरज आहे. पण सगळ्याच वैयक्तिक गोष्टी या व्यक्त करण्यासाठी नसतात ना! काहीतरी खास असत जे फक्त आपल्याच मनाच्या एका कोपरयामधे जपून ठेवलेल असत. ही सांजवेळ मात्र या सगळ्या गोष्टींना मनाच्या पृष्ठभागावर घेऊन येते. एक स्वगत सुरु होत.. मनाच.. मनाशीच! पण या स्वगतामधलं एकटेपण नकोस होऊन जात कधी कधी.... मग मात्र मन कोणाच्यातरी वाटेकडे डोळे लावून बसतं. कोणीतरी आपल...मायेन जवळ घेणारं...कौतुकान पाठ थोपटणार...आपल म्हणण ऐकून घेणार...चूक असेल तर कान पकडून खडसावणार...
आपण अगदीच एकटेही नाही जगू शकत याची बोचरी जाणीव करुन जाते ही कातरवेळ...
तर कधी मोठ्या गोतावळ्यात वेढलेले असलो तरी आत कुठेतरी आपण एकटे आहोत हे वास्तवही समोर ठेवून जाते ही कातरवेळ..
मनाला एक अपूर्णतेची चुटपूट लावून जाते ही सांजवेळ...

Monday, August 10, 2009

प्रातःचलन

अर्थातच 'Morning Walk'!! (असे प्रचलित आणि ओळखीचे शब्द वापरले की लवकर उलगडा होतो विषयाचा. असो.) तर मी रोज सकाळी लवकर उठून मस्त-मोकळ्या हवेत फिरायला जाते असा (गोड)गैरसमज कोणीही करुन घेऊ नये बरे! हां पण कधीतरी 'आपण दिवसेंदिवस जरा जास्तच आळशी होत चाललोय' असा विचार जास्तच तीव्रतेने मनाला टोचणी द्यायला लागला की 'ते काही नाही उद्या(तरी) नक्की सकाळी लवकर उठून फिरुन यायच मस्तपैकी' अस स्वतःला बजावून मी झोपी जाते. आणि मग सकाळी लवकर उठून ठरविल्याप्रमाणे सुरु होते अस्मादिकांचे प्रातःचलन!!
कधी आपल्याच 'इलाक्या'मधल्या पण पूर्वी कधी न गेलेल्या वाटेला लागयच तर कधी तळजाईची टेकडी गाठायची.
एकदा असचं फिरायला म्हणून बाहेर पडले. सकाळचे फिरणे म्हणजे भरभर चालणे अशी माझी व्याख्या. त्यानुसार मी वेगानेच चालत होते. इतक्यात शेजारुन एक मुलगा विरुद्ध दिशेने चालत गेला आणि जाता जाता एक टिप्पणी टाकून गेला. मोठ्याने गाण म्हणाला तो. कोणत माहितीये? 'हिची चाल तुरुतुरु..' मी माझ्याच विचारात चालत होते. पण गाण्याची ती ओळ टाकून ज्या चपळाईने तो तिथून पटकन निघून गेला तेव्हा मला जाणवल की हे आपल्यासाठीच होतं. आणि जेव्हा मला हे जाणवल तेव्हा मी दोन सेकंद आहे त्याच जागी स्तब्ध उभी राहिले. म्हणजे यावर काही प्रतिक्रीया द्यावी का आणि काय द्यावी असा विचार मनात येऊन गेला पण लगेच पुढच्या क्षणी मलाच हसू आले. म्हणजे मी काय तिथेच फसकन हसले नाही..(काय राव तेवढं कळतकी मला!!) पण योग्य वेळी सुचलेल्या त्या योग्य टिप्पणीबद्दल मला मनापासून हसू येत राहिले. नंतर मी मैत्रिणींना हा प्रसंग सांगितला तेव्हा त्यांनीसुद्धा हसून त्या मुलाच्या 'प्रसंगावधाना'(presence of mind) चेच कौतुक केले(?)
एकदा असच 'अपने इलाके'मे फिरत होते. हिवाळ्यातले थंडीचे दिवस असल्याने अजून पुरत उजाडलं नव्हत. पण सकाळी फिरायला येणारया लोकांची पुष्कळ वर्दळ होती रस्त्यावर. माझ्यासमोरुन एक जोडप चालत येत होत. पण काहीतरी विसंगती वाटत होत. बायको अगदी सैनिकी थाटात लेफ्ट-राईट करत चालत होती. म्हणजे डावा पाय पुढे येई तेव्हा उजवा हातही पुढ़े अगदी डोक्याच्या वरपर्यंत. आणि नजर अगदी समोर. आणि नवरामात्र अगदी अंग चोरुन, अवघडून गेल्यासारखा चालला होता. आपल्या बायकोच हे असं चालण फारच विचित्र वाटून लोक आपल्याकडेच बघत नाहीयेत ना या विचाराने अस्वस्थ झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. मी म्हटल अहो काका कशाला एवढा विचार करताय.. सकाळच्यावेळी तरी मनसोक्तपणे फिरा सगळे ताण-तणाव ठेवा बाजूला! म्हणू दे कोणाला काय म्हणायचय ते! (हो पण मी मात्र हे मनातल्या मनात म्हटल. एक तर काका ओळखीचे नव्हते आणि त्यात काकूंचा पवित्रा आक्रमक होता. :P )
एकदा तळजाईची टेकडी उतरुन खाली येत होते तेव्हा माझ्यासमोर ४-५ जणींचे महिलामंडळ चालले होते. त्या सर्वजणी त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या. (विरुद्ध गट म्हणजे 'जानी दुश्मन' वगैरे नाही बर का. तर सध्या अनुपस्थित असलेल्या व्यक्तींचा गट.) आता मला हे कसे कळाले की त्या त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या? उत्तर सोपे आहे, त्यांच्या बोलण्यावरुनच समजले मला. ;) इतक्यात समोरुन आणखी ४ जणींचे महिलामंडळ आले. 'अय्या तुम्ही आत्ता खाली उतरताय म्हणजे खूपच लवकर आला असाल नाही का? आम्हाला सांगायच ना आम्हीपण आलो असतो.' समोरच्या गटातील एकजण म्हणाली. 'आम्ही रोजच एवढ्या लवकर येतो' अगदी ठसक्यात उत्तर दिल एकीने. मग दोन्ही गट आपापल्या दिशेने निघून गेले. पण पुन्हा गप्पांमधे विरोधी गटाचीच चर्चा. त्यावरुन समजले की आत्ता गेलेलाच त्यांचा विरोधी गट होता तर. सकाळी सकाळी तरी असल्या चर्चा टाळाव्यात नाही का. (पुन्हा मी हे मनातल्या मनातच म्हटले. हो उगीच धोका कशाला पत्करायचा.)
कधी एखादा आजोबांचा गट फिरत असेल तर त्यांच्या गप्पांमधून जगातल्या सगळ्या ठळक बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळे दोन-तीन दिवस पेपर वाचला नसेल तर त्या सगळ्या बातम्यांचा ऊहापोह तुम्हाला ऐकायला मिळेल. जस्ट फोलो देम फॉर समटाईम. :)
तळजाईच्या देवीच्या मंदिरामधला 'हास्यगट' मात्र माझ्यासाठी एक आकर्षणाचा भाग आहे. तिथे जमणारी बरीच मंडळी माझ्या आजोबांच्या वयाची आहेत. आधी थोडा प्राणायाम आणि मग मोठमोठ्यान हसण्याचा व्यायाम असा यांचा क्रम! मी मात्र जेव्हाजेव्हा या हसण्याच्या वेळी तिथे पोचते तेव्हा तिथ बसून त्या सर्वांच निरीक्षण करत रहाते. कृत्रिम का असेना पण हे हसू बाहेर पडल्यावर काहीतरी समाधान देऊन जात असावं. सगळ्या जबाबदारया, ताण यांचा निचरा होऊन रहातो आणि हलक होऊन उमललेल निरागस हास्य या आजोबांच्या चेहरयावर दिसत. नंतर त्यांच्या गप्पा कानावर येत रहातात. कोणाच्या मुलाचे/मुलीचे नुकतेच दोनाचे-चार झालेले असतात.. कोणाची मुल अमेरिकेत आहेत, तिथली त्यांची ख्याली-खुशाली.. कोणाच्या मांडीवर नुकतीच नातवंड खेळायला लागेलेली असतात.. कोणाच्या गावाकडच्या शेतीच्या गप्पा किंवा नुकत्याच गावाकडे झालेल्या जत्रेतल्या गमती.. अस बरच काही.एखादी लाही गरम केल्यावर तडतडते आणि नंतर फटकन फुटून अलगद फुलून येते. या मंडळींकडे पाहिल की असचं काहीस जाणवत. प्रत्येक कडू-गोड अनुभवातून अगदी तावून-सुलाखून बाहेर पडून, मग सगळ्या अनुभवांची शिदोरी जवळ ठेवून फुलून आलेल हे आयुष्य. त्यांच बोलण ऐकता ऐकता त्यातून पाझरणार चैतन्य, उत्साह, समाधान जाणवत रहात. मग मलाही फिरायला आल्याच समाधान वाटत. ते चैतन्य आणि उत्साह बरोबर घेऊन मग मीसुद्धा नविन दिवसाच्या तयारीला लागते. :):)

Tuesday, June 30, 2009

सर्दी... कुछ लेते क्यू नही?

दोन-तीन दिवसांपासून अगदी हैराण केलय या सर्दीने! एकदा सर्दी झाली की कमीतकमी चार दिवसांची पाहुणी असतेच. मग लवकर बरे होण्यासाठी कितीही औषध-पाणी करा, हिचा चार दिवसांचा मुक्काम ठरेलेलाच! आणि एकटी येत नाही हो.. डोकेदुखी, अंगदुखी-कणकण बरोबर बरोबर घेऊनच येते.

आक् छी.. excuse me... आ..आ..आक् छी.. exxxcuse me... आक् छी.. आक् छी.. आक् छी.. (मी नाही म्हणणार excuse me... जा.. :P)
माणूस कितीही धडधाकट,हट्टा-कट्टा असला तरी सर्दी झाल्यावर किती केविलवाणा दिसतो. नाही?

पूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात यायची, एक सर्दीने बेजार झालेला माणूस - त्याची ती केविलवाणी अवस्था बघून त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला विचारत असतात, 'कुछ लेते क्यू नही?' हम्म्म्.. आता असं कुछ लेके सर्दी पटकन जात असती तर काय..!

काहीतरी लिहाव असं वाटल उगाचचं, पण सर्दीने डोक इतक बधिर आणि सर्दीमय झालय की काही(चांगल)सुचतच नाहीये. मग सर्दीवरच चार ओळी लिहिल्या..

'हाय हाय हाय ये सर्दी,

है मौसम भी बेदर्दी,

तेरे नाक मे दम कर देनेसे,

मेरा सिर भी फुटा जाये...'

'हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी' या हिंदी गाण्याच्या चालीवर या ओळी छान बसतील! मूळ गाण्यातल्या 'मजबूरी'ची जाग 'सर्दी'ने घेतलीये. त्यामुळे कमी पडलेले दोन शब्द भरून काढण्यासाठी पहिल्या ओळीमधे आणखी एक 'हाय' टाकली. पण ही तिसरी 'हाय़' या सर्दीसाठीच आहे बरे! ...अरे देवा... मी हे मघापासून काय बरळतीये... सर्दीमुळे डोकं अजिबातच चालेनासं झालय. खरच आता 'कुछ तो लेके मै सो जाती'...

काही का असेना पण या सर्दीमुळे एक दिवसतरी खरीखुरी हक्काची 'Sick Leave' घेता येते. ;) :)