Wednesday, April 15, 2009

रुकावट के लिये खेद है|

ही ओळ दूरदर्शन बघणारया प्रत्येकाच्या परिचयाची आहे. दूरदर्शनवर एखादा कार्यक्रम बघता बघता प्रक्षेपणामधे बिघाड निर्माण झाला की हमखास ही पाटी वाचायला मिळते. अशाप्रकारची रुकावट आणि त्यामुळे होणारा खेद मी समजू शकते. म्हणजे जर प्रक्षेपणातच बिघाड असेल तर अशा रुकावटीसाठी खेद व्यक्त करण्याशिवाय आपण तरी काय करु शकतो! पण जेव्हा आपण आपल्या आवडीचा एखादा कार्यक्रम खूप एकाग्रतेने बघत असतो आणि तेव्हा कुणीतरी, आपण तो कार्यक़्रम किती आवडीने/तन्मयतेने बघतोय हे न जुमानता आपल्या मनोरंजनामधे 'रुकावट' निर्माण करतो तेव्हा? तेव्हा त्या रुकावटीसाठी खेद नाही गुस्सा वाटतो. आता ही एवढी सगळी प्रस्तावना कशासाठी केली हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. झी मराठीवरचा 'आयडीया सारेगमप' हा कार्यक्रम मी न चुकता पहाते. बरयाचवेळा खूप दिवसात न ऐकलेली-जुनी, नवी छान छान गाणी या निमित्ताने ऐकायला मिळतात. :)
एकदा काही कारणाने रात्री मी हा कार्यक्रम पाहू शकले नाही. अनायसे दुसरया दिवशी सुट्टी होती, त्यामुळे दुसरया दिवशी दुपारी याच पुनःप्रक्षेपण पहायच अस मी मनाशी बजावून ठेवलं.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आमच्या इमारतीमधे 'वाळवणं' हंगाम सुरु आहे. म्हणजे भातवड्या,पापड, कुरडया इ.इ. करण्याची तयारी सुरु आहे. आता कधी, कसं, काय करायचं याची चर्चा करायला शेजारच्या काकू घरी आल्या होत्या. (अर्थातच ही चर्चा त्या आईबरोबर करणार होत्या.) स्वयंपाकघरात त्यांची चर्चा सुरु होती आणि मी बाहेर मस्तपैकी 'झी'वरच्या गाण्यांच्या मैफीलीचा आनंद घेत होते. इतक्यात काकू बाहेर आल्या, माझ्याशेजारी येऊन बसल्या. समोर नुकतच एक छान गाण सुरु होत होतं. मी कान देऊन ऐकत होते. आणि इकडे काकूंना माझ्याशी बोलायची हुक्की आली होती. 'अगं मी हा कार्यक्रम कालच पाहिला. छान झाल हे गाणं.'(हो का! मग आता मला ऐकू द्या ना - इति मी मनातल्या मनात) गाण्यावरून मग काकूंची गाड़ी दुसरया विषयाकडे वळली. 'अग आमची ही ना आता अमुक एक कोर्स करणार आहे. अमक्या ठिकाणी जाते अभ्यासाला. तमक्या ठिकाणी प्रयत्न सुरु आहेत इ. इ.' अशी काकूंची बडबड सुरुच! मी शक्य तेवढे सोज्वळ हसू चेहेरयावर आणण्याचा प्रयत्न करत होते आणि 'हो का', 'बरं' असे शब्द मधेमधे फेकत होते. माझे कान गाण्याकडे आणि डोळे काकूंकडे होते. (म्हणजे मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाही हा त्यांचा समज जपण्याचा प्रयत्न करत होते) गाण सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत त्या एकसारख्या बोलत होत्या. आणि ज्या क्षणाला गाण संपल त्या क्षणाला त्या उठून आत गेल्या. म्हणजे त्यांच बोलण संपल म्हणून त्या आत गेल्या. आता मला सांगा नाही का होणार माझी चिडचिड? नेमक गाण्याच्या वेळेतच तेवढी रुकावट निर्माण झाली होती. आता तुम्ही म्हणाल एक गाण तर होत ना मग ते काय कधीही ऐकता येईल की एवढं चिडायचय काय त्यात? ठीक आहे पण जेव्हा समोर कुणी कसलेला कलाकार एखाद आपल्या आवडीच गाण गात असेल तर अशावेळी ऐकायला छान वाटतं. त्यातून माझी गाण्याची आवड तर काकूंना माहितच आहे. असं असताना तरी निदान...! जाऊ देत आता काय बोलणार! इस रुकावट के लिये भी खेद व्यक्त करने के सिवा और क्या कर सकते है....

2 comments:

भानस said...

मलाही भयंकर राग येतो असे झाले तर. नेमके समोरचे माणूस असे असते की तोंड दाबून बुक्क्याचा मार...:)
आवडले.

Aparna said...

:)