Wednesday, April 15, 2009

रुकावट के लिये खेद है|

ही ओळ दूरदर्शन बघणारया प्रत्येकाच्या परिचयाची आहे. दूरदर्शनवर एखादा कार्यक्रम बघता बघता प्रक्षेपणामधे बिघाड निर्माण झाला की हमखास ही पाटी वाचायला मिळते. अशाप्रकारची रुकावट आणि त्यामुळे होणारा खेद मी समजू शकते. म्हणजे जर प्रक्षेपणातच बिघाड असेल तर अशा रुकावटीसाठी खेद व्यक्त करण्याशिवाय आपण तरी काय करु शकतो! पण जेव्हा आपण आपल्या आवडीचा एखादा कार्यक्रम खूप एकाग्रतेने बघत असतो आणि तेव्हा कुणीतरी, आपण तो कार्यक़्रम किती आवडीने/तन्मयतेने बघतोय हे न जुमानता आपल्या मनोरंजनामधे 'रुकावट' निर्माण करतो तेव्हा? तेव्हा त्या रुकावटीसाठी खेद नाही गुस्सा वाटतो. आता ही एवढी सगळी प्रस्तावना कशासाठी केली हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. झी मराठीवरचा 'आयडीया सारेगमप' हा कार्यक्रम मी न चुकता पहाते. बरयाचवेळा खूप दिवसात न ऐकलेली-जुनी, नवी छान छान गाणी या निमित्ताने ऐकायला मिळतात. :)
एकदा काही कारणाने रात्री मी हा कार्यक्रम पाहू शकले नाही. अनायसे दुसरया दिवशी सुट्टी होती, त्यामुळे दुसरया दिवशी दुपारी याच पुनःप्रक्षेपण पहायच अस मी मनाशी बजावून ठेवलं.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आमच्या इमारतीमधे 'वाळवणं' हंगाम सुरु आहे. म्हणजे भातवड्या,पापड, कुरडया इ.इ. करण्याची तयारी सुरु आहे. आता कधी, कसं, काय करायचं याची चर्चा करायला शेजारच्या काकू घरी आल्या होत्या. (अर्थातच ही चर्चा त्या आईबरोबर करणार होत्या.) स्वयंपाकघरात त्यांची चर्चा सुरु होती आणि मी बाहेर मस्तपैकी 'झी'वरच्या गाण्यांच्या मैफीलीचा आनंद घेत होते. इतक्यात काकू बाहेर आल्या, माझ्याशेजारी येऊन बसल्या. समोर नुकतच एक छान गाण सुरु होत होतं. मी कान देऊन ऐकत होते. आणि इकडे काकूंना माझ्याशी बोलायची हुक्की आली होती. 'अगं मी हा कार्यक्रम कालच पाहिला. छान झाल हे गाणं.'(हो का! मग आता मला ऐकू द्या ना - इति मी मनातल्या मनात) गाण्यावरून मग काकूंची गाड़ी दुसरया विषयाकडे वळली. 'अग आमची ही ना आता अमुक एक कोर्स करणार आहे. अमक्या ठिकाणी जाते अभ्यासाला. तमक्या ठिकाणी प्रयत्न सुरु आहेत इ. इ.' अशी काकूंची बडबड सुरुच! मी शक्य तेवढे सोज्वळ हसू चेहेरयावर आणण्याचा प्रयत्न करत होते आणि 'हो का', 'बरं' असे शब्द मधेमधे फेकत होते. माझे कान गाण्याकडे आणि डोळे काकूंकडे होते. (म्हणजे मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाही हा त्यांचा समज जपण्याचा प्रयत्न करत होते) गाण सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत त्या एकसारख्या बोलत होत्या. आणि ज्या क्षणाला गाण संपल त्या क्षणाला त्या उठून आत गेल्या. म्हणजे त्यांच बोलण संपल म्हणून त्या आत गेल्या. आता मला सांगा नाही का होणार माझी चिडचिड? नेमक गाण्याच्या वेळेतच तेवढी रुकावट निर्माण झाली होती. आता तुम्ही म्हणाल एक गाण तर होत ना मग ते काय कधीही ऐकता येईल की एवढं चिडायचय काय त्यात? ठीक आहे पण जेव्हा समोर कुणी कसलेला कलाकार एखाद आपल्या आवडीच गाण गात असेल तर अशावेळी ऐकायला छान वाटतं. त्यातून माझी गाण्याची आवड तर काकूंना माहितच आहे. असं असताना तरी निदान...! जाऊ देत आता काय बोलणार! इस रुकावट के लिये भी खेद व्यक्त करने के सिवा और क्या कर सकते है....

Wednesday, March 18, 2009

मै और मेरी तनहाई....

प्रत्येकाची एक ठरलेली दिनचर्या असते. नेहमी ती तशीच साचेबद्ध असते अस नाही. या ठराविकपणापेक्षा वेगळ असही काही घडत असतं. नेहमीच्या गोष्टी/प्रसंग सांभाळता सांभाळता अशा नविन गोष्टींनाही सामोर जाव लागत. रोजच्या धावपळीत कधीतरी काही जुने प्रश्न डोक वर काढतात तर काही नवे निर्णय आपल्या वाटेवर वाट पहात उभे असतात. कधी काही गोष्टी वेळेअभावी करायच्या राहून गेलेल्या असतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी वेळेच व्यवस्थापन कस कराव याचा विचार करायलाही आपण सवड काढलेली नसते. या सगळ्या गोष्टी अशाच साचून राहिल्या तर विचारांचा खूप गोंधळ उडतो मनामधे. सगळेच विचार एकदम डोक्यात थैमान घालू लागतात. मग थोडी चिडचिड वाढते. एकाग्रता थोडी कमी होते कारण मन कुठल्या एका विचारावर स्थिर नसत, बरयाच विचारांनी ते व्यापून राहिलेल असतं. अशावेळी स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज असते. जरा स्वतःला एकांतात घेऊन जावं...
एकांत माझ्याशी खूप बोलतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो, माझ्याबरोबर हसतो, परिस्थितीला पर्याय सुचवतो, एखाद्या गोष्टीवर विचार करण्याचा नवा दृष्टिकोन देतो, गोंधळलेल्या मनाला समजावून घेतो आणि योग्य ती समजही देतो. डोकं शांत होतं. मनातले प्रश्न मागे टाकून पुढे पळणारया आयुष्याला क्षणभर विसावा मिळतो, स्थिरता मिळते. खूप छान मोकळ वाटतं. पुन्हा नेहमीच्या धावत्या चाकावर स्वार व्हायला मन तयार होत.
जेव्हा मानसिक गरज असते तेव्हा जरूर एकांतात रहाव. हो पण सारख सारख नाही बरं का! :)

बाथरूम सिंगर्स....

सगळ्यांना थोडीच गोड, गाता गळा मिळतो? पण म्हणून काय त्यांनी गायचं नाही अस थोडीच असत! मग अशा माझ्यासारख्यांसाठी हे एक हक्काच व्यासपीठ आहे. ;)
एखाद गाण ऐकल, आवडल की ते गुणगुणावसं वाटत, कधी मोठ्याने म्हणून बघावसं वाटत. मग घरात गायला लागलं की असतातच आमचे छोटे बंधुराज, चित्र-विचित्र हावभाव करत, मी किती छान(?) गातीये याची पोचपावती द्यायला. :) एखादं नवं वा जुनं गाण प्रत्येकालाच आवडतं. आवडण्याची कारण वेगवेगळी असू शकतात. कधी गाण्याचे बोल आवडतात, कधी पार्श्वसंगीत आवडत तर कधी गाण्याची 'हटके स्टाईल' आवडते. मग ते गाण आपण नकळत गुणगुणायला लागतो. पण गुणगुणण्याची वारंवारता आणि आवाज वाढला की आजुबाजूच्या लोकांची बोटं कानात जायला लागतात :( मग गाणारा आवाज कमी व्हायला लागतो. गाण्यासाठी बाहेर पडू बघणारा हा दबलेला आवाज, बाथरूममध्य़े शिरल की गळ्यातून बंड करून बाहेर पडतो. तशी मीहि एक बाथरुम सिंगरच.. बाथरुमची ती १0 x ४ ची जागा म्हणजे गाण्यासाठी मिळालेलं हक्काच व्यासपीठ आहे माझ्यासाठी! पण आतून गाण्याचा आवाज यायला लागला की बाहेरुन जोरजोरात दार वाजायला लागत, 'लवकर आवरा, ऑफीसला जायला उशीर होतोय, गाणी नंतर म्हणा'- इति मातोश्री. पण काय करणार हाडाच्या बाथरुम सिंगरला गाण म्हटल्याशिवाय स्वस्थ कस बसवेल! :)
आम्ही नवीन फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हाची गोष्ट. इथे सगळेच लोक नवे होते. नुकतीच ओळख व्हायला लागली होती. इथे प्रत्येक मजल्यावर ४ फ्लॅटस. मधे एक मोठा पॅसेज आणि त्याच्याकडेने एका बाजूचे सगळे फ्लॅटस एकाखाली एक. सुरुवातीला गाण्यासाठी बाहेर पडणारा आवाज मी प्रयत्नपूर्वक शांत ठेवला. कारण मधे रिकामा पॅसेज असल्यामुळे, गायला सुरुवात केली की तो आवाज आमच्या फ्लॅटच्या बाजूला असलेल्या, वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या फ्लॅटसमधे पसरणार होता. आणि न जाणो माझा आवाज सहन न होऊन कोणीतरी तक्रार करायला घरी आल तर..! पण अस किती दिवस चालणार होत? शेवटी एकदा हा आवाज फुटलाच! मनसोक्तपणे मोठ्याने गाणी म्हणून घेतली. नंतर ऑफीसला निघायच होत त्यामुळे आवरण्याची गडबड सुरु होती. इतक्यात माझा भ्रमणध्वनी वाजला. त्याच्या आतल्या कप्प्यामधे(इनबॉक्स)संदेश आला होता. आलेला संदेश वाचता वाचता मला हसू यायला लागल.संदेश होता - 'गुड सॉंन्ग. वन्स मोरं' खालच्या मजल्यावरच्या काकूंनी माझ्या गाण्याला दिलेली दाद होती. :) ते वाचून मलाही मजाच वाटली. बाथरुम सिंगर्सनासुद्धा गाण्याची पोचपावती मिळते तर! आता तर माझ हे गाण्याच वेडं सगळ्यांनाच माहीत झालय. बरेच दिवस गाण ऐकू आल नाही की काकू विचारतात, 'काय अपर्णा कुठे आहेस? तुझ गाण ऐकल नाही बरेच दिवस.' ;) इतकच नाही तर आमच्या इमारतीमधे बाथरुम सिंगर्सची संख्यापण वाढलीये. :) आपणही गाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि असं गाताना किती आनंद मिळतो हे सगळ्यांनाच कळायला लागलय.
आत्ता हे लिहीत असताना मी एक मस्त गाणं ऐकतीये.. 'ए मस्सकली मस.. मसकली उड मट्टकली मट्टकली....' मोहित चौहानची गाण्याची अदा आवडली मला :) आणि या गाण्याच्या या ओळी मला जास्तच आवडल्या -
'उडियो न डरियो कर मनमानी मनमानी मनमानी....'
चालू देत गाण्याची मनमानी... :)

Tuesday, March 3, 2009

एक छोटीसी बात..

कधी कधी काही छोटे-छोटे प्रसंगसुद्धा आपल्याला बरचकाही शिकवून जातात. असाच एक प्रसंग-सकाळी नेहमीप्रमाणे ७.३० वाजता, ऑफीसला जाण्यासाठी घरून निघाले. माझ्या स्टॉपपर्यंत पोचण्यासाठी साधारण १० मिनिटाच अंतर चालत जाव लागत. मी मुख्य रस्त्यापर्यंत आले. आता रस्ता पार करून जायच होतं. इतक्यात मी एका लहान मुलीला पाहील. ती साधारण पहिली किंवा दुसरीला असेल. शाळेचा गणवेश घातला होता आणि पाठीवर दप्तर होते. ती रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात होती. रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती. गाड्या अगदी भरधाव वेगाने येत होत्या आणि ती जीव मुठीत घेऊन उभी होती, पुढच पाऊल कधी टाकू असा विचार करत होती. तिला पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की आई-वडिलांनी एव्हढ्याशा मुलीला एकटीला पाठवलच कसं? एव्हढा निष्काळजीपणा कसा करू शकतात? गाड्या अशा भरधाव येत असतात, या मुलीला अपघात होण्याची शक्यता आहे. असे सगळे विचार भर्रकन मनात येऊन गेले. इतक्यात एक दुचाकीस्वार, गाडीचा वेग कमी करून, माझ्याकडे हात करून म्हणाला, 'तिला(म्हणजे त्या मुलीला) तुमच्याबरोबर घेऊन जा.' मीपण विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. पटकन तिच्याजवळ जाऊन तिचा इवलासा हात पकडला आणि मग आम्ही दोघींनी रस्ता पार केला. मग मी माझ्या स्टॉपजवळ येऊन थांबले आणि ती तिच्या शाळेच्या रस्त्याने निघून गेली. मला मात्र मनात थोडीशी खंत वाटली किंवा एक अपराधीपणा जाणवला, की ती मुलगी अशी रस्त्याच्यामधे उभी असताना मी विचार काय करत बसले? आध पटकन तिचा हात धरून रस्ता पार करायचा ना! की मी खूप चाकोरीबद्ध होऊन गेलीये? बरयाचदा प्रसंगावधान फार महत्त्वाचे असते. एखाद्या क्षणी विचार करण्यापेक्षा पटकन कृती करणं हे त्या क्षणी घडणारया प्रसंगाची उकल करण्यासाठी योग्य असतं.(need of hour/moment) त्या दुचाकीस्वाराची मी आभारी आहे कारण त्याने वेळेत मला भानावर आणलं.नंतर मी ठरवल की अशाप्रकारे जेव्हा एखादा प्रसंग तुमच्याकडून चांगल्या कृतीची अपेक्षा करत असेल तेव्हा विचार करण्यात वेळ दवडून ती संधी वाया घालवायची नाही. अस ठरवल्यावर मला जरा हायसं वाटल.. :) पाहिल तर प्रसंग छोटासाचं, पण खूपकाही शिकवून गेला. अंतर्मुख करून गेला....

Friday, February 27, 2009

येशील का परतून कधी?

येशील का परतून कधी विश्वात माझ्या
भरशील का रंग स्वप्नात माझ्या
मिटल्या डोळ्यात दाटले पाणी,
बांध हा पुन्हा रोखशील का कधी..
मूक ओठात हरवले शब्द,
माग तयान्चा घेशील का कधी
लोपलेल्या सुरान्चे,
कोमेजलेल्या कळ्यान्चे,
देणे देशील का कधी
परतून येशील का कधी...
परतून येशील का कधी..?

Tuesday, February 24, 2009

वादळवाट - शीर्षकगीत

वादळवाट - शीर्षकगीत
थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले.
कधी उतरला चन्द्र तुझ्या-माझ्या अंगणात,
स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत.
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदी काठ
कधी हरवली वाट...
वारया-पावसाची गाज,
काळी भासे गच्च दाट.
कधी धुसरं धुसरं,
एक वादळाची वाट..
- मंगेश कुलकर्णी

ऐकलय हे गाण? अजूनपर्यंत नसेल ऐकल तर जरुर ऐका.

रुळलेल्या वाटा आणि पोळलेली मने...

टायटल वाचल्यावर, विषय गंभीर आहे असं वाटतय ना! हम्म... पण विषय गंभीर आहे किंवा नाही यापेक्षा तो कसा समजावून घेतला जातोय हे महत्त्वाचं आहे. मला जे जाणवल, ते फक्त इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
लहान असताना, एक प्रश्न मला बरयाचदा विचारला जायचा, 'काय मग तू मोठेपणी कोण होणार?' मी फारसा विचार न करता सांगायचे 'मी डॉक्टर होणार.' अस मी का सांगायचे हे मला त्यावेळी सांगता नसते आले. कदाचित 'डॉक्टर' होण हे मला एक प्रतिष्ठेच लक्षण वाटायच. पण मग मला हे समजल कुठून? मोठ्या लोकांच्या गप्पांमधून? अमक्याचा मुलगा डॉक्टर झाला, तमक्याची मुलगी इंजिनिअर झाली. नाव काढल हो पोरांनी.' त्यांना मिळणारा भाव पाहिल्यावर, स्वतःहालाही अशाच भूमिकेत जगासमोर मांडल्यावर आपणही चांगले नाव कमावल्यासारखे होईल अशी माझ्या मनाची समजूत झाली असणार. नक्कीच!
खरच डॉक्टर, इंजिनिअर याच ठराविक वाटा आहेत का चांगल करिअर घडविण्याच्या? इथे मी, या करिअरमधे असणारया किंवा करिअर घडवू पहाणारयांकडे बोट दाखवत नाहीये. तर मला असं म्हणायचय की लहानपणी मूल जेव्हा घडत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट त्याच्या मनावर बिंबवण्यापेक्षा, त्याच्या मनाचा नैसर्गिक कल जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच करिअर घडल तर ते खरया अर्थाने त्याला आयुष्यभर समाधान देत राहील.
'job satisfaction' ही संज्ञा कुठून आली? आज मी कितीतरी मुला-मुलींना पहाते,इंजिनिअरींगची डिग्री घेऊन चांगल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी करतायत. पगारही चांगला आहे! पण नोकरीमधे समाधानी नाहीत. नोकरीची सुरूवातीची वर्षे नव्या नवलाईमुळ छान वाटतात. पण नंतर जेव्हा जाणवायला लागत की या नोकरीमधे स्वतःचा interest/liking कमी आहे, तेव्हा मन अस्वस्थ व्हायला लागत. मग जाणवत की आपण हे करिअर निवडताना 'मनाचा कौल' घेतलाच नाही. केवळ रूळलेल्या वाटेवरून चालत गेलो. आपण ज्याप्रकारची नोकरी करतोय तिथे आपल्यामधे असलेलं potential/talent पुरेपूर वापरल जात नाहीये. ही जाणिव सतत टोचत रहाते. अशावेळी काहीजण PG करायच ठरवतात. पण यावेळीमात्र निर्णय डोळसपणे घेतला जातो. PG कशात करायच? का करायच, कुठे करायच, माझा interest कशामधे आहे इ. पुन्हा पहिले पाढे गिरवायचे नसतात ना म्हणून!
काहीजण मी असेही पाहिले आहेत, ज्यानी चांगल्या पगाराची/हुद्द्याची नोकरी सोडली. प्रमुख कारण म्हणजे No job satisfaction. आणि नंतर पूर्णवेळ प्रशासकीय सेवेत जाण्याची तयारी सुरू केली. त्यामधे ते यशस्वीसुद्धा झाले. अशाप्रकारे नवीन मार्ग शोधून तिथे आपले बस्तान बसविणारे नक्कीच समाधानी होतात. पण ज्यांना दुसरा मार्ग सापडत नाही किंवा सापडला तरी परिस्थितीमुळे तो मार्ग निवडणे त्यांना शक्य होत नाही त्यांच काय? अस नाही की ते आयुष्यात यशस्वी नसतात. पण जर job satisfaction नसेल तर potential असूनही ते १००% देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य खूप मेकॅनिकल होऊन जात का? (Rock On मधे फरहान अख्तरने जे character केलय तसं).
काही लोक असतात ज्यांना खूप लवकर समजत की त्यांना आयुष्यात पुढे काय करायचय. पं. भीमसेन जोशी हे असच एक व्यक्तिमत्त्व आहे. किती लहान वयात त्याना समजल होत की 'मला शास्त्रीय संगीत शिकायचय'. त्यावेळी गाण्यात करिअर घडवायच वगैरे असे विचारही त्यांच्या मनात आले नव्हते पण स्वतःची गाण्याची आवड त्याना कळाली होती. आणि पुढे त्यांची घडलेली कारकीर्द आपल्याला माहीत आहेच. अशा व्यक्ती खरच खूप भाग्यवान असतात.
हल्लीची मुले करिअरच्याबाबतीत अगदी चोखंदळ आहेत. दहावी-बारावीची परीक्षा देत असतानाच त्यांचे PG कशात करायच आणि कुठे करायच इथपर्यंतचे planning झालेले असते. पालक आणि मुलांनी करिअर निवडताना संवेदनक्षम राहिल तर पुढे कोमेजणारया/पोळणारया मनांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.