Wednesday, March 18, 2009

मै और मेरी तनहाई....

प्रत्येकाची एक ठरलेली दिनचर्या असते. नेहमी ती तशीच साचेबद्ध असते अस नाही. या ठराविकपणापेक्षा वेगळ असही काही घडत असतं. नेहमीच्या गोष्टी/प्रसंग सांभाळता सांभाळता अशा नविन गोष्टींनाही सामोर जाव लागत. रोजच्या धावपळीत कधीतरी काही जुने प्रश्न डोक वर काढतात तर काही नवे निर्णय आपल्या वाटेवर वाट पहात उभे असतात. कधी काही गोष्टी वेळेअभावी करायच्या राहून गेलेल्या असतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी वेळेच व्यवस्थापन कस कराव याचा विचार करायलाही आपण सवड काढलेली नसते. या सगळ्या गोष्टी अशाच साचून राहिल्या तर विचारांचा खूप गोंधळ उडतो मनामधे. सगळेच विचार एकदम डोक्यात थैमान घालू लागतात. मग थोडी चिडचिड वाढते. एकाग्रता थोडी कमी होते कारण मन कुठल्या एका विचारावर स्थिर नसत, बरयाच विचारांनी ते व्यापून राहिलेल असतं. अशावेळी स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज असते. जरा स्वतःला एकांतात घेऊन जावं...
एकांत माझ्याशी खूप बोलतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो, माझ्याबरोबर हसतो, परिस्थितीला पर्याय सुचवतो, एखाद्या गोष्टीवर विचार करण्याचा नवा दृष्टिकोन देतो, गोंधळलेल्या मनाला समजावून घेतो आणि योग्य ती समजही देतो. डोकं शांत होतं. मनातले प्रश्न मागे टाकून पुढे पळणारया आयुष्याला क्षणभर विसावा मिळतो, स्थिरता मिळते. खूप छान मोकळ वाटतं. पुन्हा नेहमीच्या धावत्या चाकावर स्वार व्हायला मन तयार होत.
जेव्हा मानसिक गरज असते तेव्हा जरूर एकांतात रहाव. हो पण सारख सारख नाही बरं का! :)

बाथरूम सिंगर्स....

सगळ्यांना थोडीच गोड, गाता गळा मिळतो? पण म्हणून काय त्यांनी गायचं नाही अस थोडीच असत! मग अशा माझ्यासारख्यांसाठी हे एक हक्काच व्यासपीठ आहे. ;)
एखाद गाण ऐकल, आवडल की ते गुणगुणावसं वाटत, कधी मोठ्याने म्हणून बघावसं वाटत. मग घरात गायला लागलं की असतातच आमचे छोटे बंधुराज, चित्र-विचित्र हावभाव करत, मी किती छान(?) गातीये याची पोचपावती द्यायला. :) एखादं नवं वा जुनं गाण प्रत्येकालाच आवडतं. आवडण्याची कारण वेगवेगळी असू शकतात. कधी गाण्याचे बोल आवडतात, कधी पार्श्वसंगीत आवडत तर कधी गाण्याची 'हटके स्टाईल' आवडते. मग ते गाण आपण नकळत गुणगुणायला लागतो. पण गुणगुणण्याची वारंवारता आणि आवाज वाढला की आजुबाजूच्या लोकांची बोटं कानात जायला लागतात :( मग गाणारा आवाज कमी व्हायला लागतो. गाण्यासाठी बाहेर पडू बघणारा हा दबलेला आवाज, बाथरूममध्य़े शिरल की गळ्यातून बंड करून बाहेर पडतो. तशी मीहि एक बाथरुम सिंगरच.. बाथरुमची ती १0 x ४ ची जागा म्हणजे गाण्यासाठी मिळालेलं हक्काच व्यासपीठ आहे माझ्यासाठी! पण आतून गाण्याचा आवाज यायला लागला की बाहेरुन जोरजोरात दार वाजायला लागत, 'लवकर आवरा, ऑफीसला जायला उशीर होतोय, गाणी नंतर म्हणा'- इति मातोश्री. पण काय करणार हाडाच्या बाथरुम सिंगरला गाण म्हटल्याशिवाय स्वस्थ कस बसवेल! :)
आम्ही नवीन फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हाची गोष्ट. इथे सगळेच लोक नवे होते. नुकतीच ओळख व्हायला लागली होती. इथे प्रत्येक मजल्यावर ४ फ्लॅटस. मधे एक मोठा पॅसेज आणि त्याच्याकडेने एका बाजूचे सगळे फ्लॅटस एकाखाली एक. सुरुवातीला गाण्यासाठी बाहेर पडणारा आवाज मी प्रयत्नपूर्वक शांत ठेवला. कारण मधे रिकामा पॅसेज असल्यामुळे, गायला सुरुवात केली की तो आवाज आमच्या फ्लॅटच्या बाजूला असलेल्या, वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या फ्लॅटसमधे पसरणार होता. आणि न जाणो माझा आवाज सहन न होऊन कोणीतरी तक्रार करायला घरी आल तर..! पण अस किती दिवस चालणार होत? शेवटी एकदा हा आवाज फुटलाच! मनसोक्तपणे मोठ्याने गाणी म्हणून घेतली. नंतर ऑफीसला निघायच होत त्यामुळे आवरण्याची गडबड सुरु होती. इतक्यात माझा भ्रमणध्वनी वाजला. त्याच्या आतल्या कप्प्यामधे(इनबॉक्स)संदेश आला होता. आलेला संदेश वाचता वाचता मला हसू यायला लागल.संदेश होता - 'गुड सॉंन्ग. वन्स मोरं' खालच्या मजल्यावरच्या काकूंनी माझ्या गाण्याला दिलेली दाद होती. :) ते वाचून मलाही मजाच वाटली. बाथरुम सिंगर्सनासुद्धा गाण्याची पोचपावती मिळते तर! आता तर माझ हे गाण्याच वेडं सगळ्यांनाच माहीत झालय. बरेच दिवस गाण ऐकू आल नाही की काकू विचारतात, 'काय अपर्णा कुठे आहेस? तुझ गाण ऐकल नाही बरेच दिवस.' ;) इतकच नाही तर आमच्या इमारतीमधे बाथरुम सिंगर्सची संख्यापण वाढलीये. :) आपणही गाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि असं गाताना किती आनंद मिळतो हे सगळ्यांनाच कळायला लागलय.
आत्ता हे लिहीत असताना मी एक मस्त गाणं ऐकतीये.. 'ए मस्सकली मस.. मसकली उड मट्टकली मट्टकली....' मोहित चौहानची गाण्याची अदा आवडली मला :) आणि या गाण्याच्या या ओळी मला जास्तच आवडल्या -
'उडियो न डरियो कर मनमानी मनमानी मनमानी....'
चालू देत गाण्याची मनमानी... :)

Tuesday, March 3, 2009

एक छोटीसी बात..

कधी कधी काही छोटे-छोटे प्रसंगसुद्धा आपल्याला बरचकाही शिकवून जातात. असाच एक प्रसंग-सकाळी नेहमीप्रमाणे ७.३० वाजता, ऑफीसला जाण्यासाठी घरून निघाले. माझ्या स्टॉपपर्यंत पोचण्यासाठी साधारण १० मिनिटाच अंतर चालत जाव लागत. मी मुख्य रस्त्यापर्यंत आले. आता रस्ता पार करून जायच होतं. इतक्यात मी एका लहान मुलीला पाहील. ती साधारण पहिली किंवा दुसरीला असेल. शाळेचा गणवेश घातला होता आणि पाठीवर दप्तर होते. ती रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात होती. रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती. गाड्या अगदी भरधाव वेगाने येत होत्या आणि ती जीव मुठीत घेऊन उभी होती, पुढच पाऊल कधी टाकू असा विचार करत होती. तिला पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की आई-वडिलांनी एव्हढ्याशा मुलीला एकटीला पाठवलच कसं? एव्हढा निष्काळजीपणा कसा करू शकतात? गाड्या अशा भरधाव येत असतात, या मुलीला अपघात होण्याची शक्यता आहे. असे सगळे विचार भर्रकन मनात येऊन गेले. इतक्यात एक दुचाकीस्वार, गाडीचा वेग कमी करून, माझ्याकडे हात करून म्हणाला, 'तिला(म्हणजे त्या मुलीला) तुमच्याबरोबर घेऊन जा.' मीपण विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. पटकन तिच्याजवळ जाऊन तिचा इवलासा हात पकडला आणि मग आम्ही दोघींनी रस्ता पार केला. मग मी माझ्या स्टॉपजवळ येऊन थांबले आणि ती तिच्या शाळेच्या रस्त्याने निघून गेली. मला मात्र मनात थोडीशी खंत वाटली किंवा एक अपराधीपणा जाणवला, की ती मुलगी अशी रस्त्याच्यामधे उभी असताना मी विचार काय करत बसले? आध पटकन तिचा हात धरून रस्ता पार करायचा ना! की मी खूप चाकोरीबद्ध होऊन गेलीये? बरयाचदा प्रसंगावधान फार महत्त्वाचे असते. एखाद्या क्षणी विचार करण्यापेक्षा पटकन कृती करणं हे त्या क्षणी घडणारया प्रसंगाची उकल करण्यासाठी योग्य असतं.(need of hour/moment) त्या दुचाकीस्वाराची मी आभारी आहे कारण त्याने वेळेत मला भानावर आणलं.नंतर मी ठरवल की अशाप्रकारे जेव्हा एखादा प्रसंग तुमच्याकडून चांगल्या कृतीची अपेक्षा करत असेल तेव्हा विचार करण्यात वेळ दवडून ती संधी वाया घालवायची नाही. अस ठरवल्यावर मला जरा हायसं वाटल.. :) पाहिल तर प्रसंग छोटासाचं, पण खूपकाही शिकवून गेला. अंतर्मुख करून गेला....